21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeलातूरदूध डेअरीच्या तेरा एकर जमिनीवर अनेकांचा डोळा

दूध डेअरीच्या तेरा एकर जमिनीवर अनेकांचा डोळा

एकमत ऑनलाईन

उदगीर (एल. पी. उगिले) : जुन्या उदगीर तालुक्यातील जळकोट, देवणी आणि उदगीर या भागातील शेतक-यांच्या हितासाठी स्व. शंकररावजी चव्हाण यांनी १९७४-७५ साली उदगीर येथे दूध उत्पादनाचा जोडधंदा करून शेतकरी आर्थिक स्वावलंबी व्हावा. या उदात्त हेतूने दूध भुकटी प्रकल्प, दूध डेअरी सुरू केली. या दूध डेरी मुळे डोंगराळ भागातील शेतक-यांना मोठा फायदा झाला. १९७८ साली दूध भुकटी प्रकल्प सुरू झाला. साधारणत: चार कोटी रुपयांचा हा प्रकल्प शेकडो शेतक-यांंना आर्थिक पाठबळ देणारा ठरला. परंतु पुढील कालावधित या प्रकल्पाची भरभरात होण्या ऐवजी तो मोडकळीस आला. यात राजकीय महत्वाकांक्षा आडवी आल्याने या प्रकल्पाची अवस्था बिकट झाली आहे. जवळपास या प्रकल्पाचा बळीच गेला आहे.

शहराच्या मध्यवस्तीत १३ एकर जमिनीवर हा प्रकल्प उभा राहिला. दूध भुकटी प्रकल्पासाठी गावरान व देशी गाय आणि म्हशीच्या दुधापासून बनवलेले पावडर एक नवीन ब्रँड ठरले होते. देशातील अनेक राज्यातून आणि परदेशातही या दूध भुकटीची मागणी वाढली. गुजरात, नवी दिल्ली, पंजाब, हरियाणा या भागातून तर अ‍ॅडव्हान्स बुंिकग करून दूध पावडरची मागणी केली जात होती. १९९० च्या काळात या शासकीय दूध योजनेला आणि दूध भुकटी प्रकल्पाला सोन्याचे दिवस आले होते. साधारणत: एक लाख दहा हजार लिटर दूध संकलन क्षमता असलेल्या या प्रकल्पाच्या ठिकाणी तब्बल दीड लाखापर्यंत दूध संकलन केले जात होते. दूध भुकटी प्रकल्पातून अकरा मेट्रिक टन पावडर निर्माण केले जात होते.

या शासकीय दूध योजना आणि दुधभुकटी प्रकल्पांतर्गत तब्बल ४२४ कर्मचारी कार्यरत होते. मात्र यानंतर कुठे माशी शिंकली? कळायला मार्ग नाही. हा प्रकल्प यशोशिखरावर असतानाच अचानक दूध भुकटी प्रकल्प बंद पडला की पाडला? हा तपासाचा मुद्दा आहे. अचानक दुधभुकटी प्रकल्पाला उतरती कळा आल्याने शेतक-यांच्या दूध संकलनावर विपरीत परिणाम होऊ लागल्याने, शेतक-यांच्या हितासाठी म्हणून तत्कालीन आमदार चंद्रशेखर भोसले यांनी तत्कालीन मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांना विनंती करून शेतक-यांना जोडधंदा म्हणून आधार ठरणारा हा प्रकल्प बंद पडू नये. त्यासाठी काही निधी द्यावा म्हणून मागणी केली. त्यावेळेस शेतक-यांचे हित लक्षात घेऊन लोकनेते विलासरावजी देशमुख यांनी विशेष तरतूद करून दूध भुकटी प्रकल्प सुरू केला.

त्यानंतर या ठिकाणी काही कर्मचारी आणि अधिका-यांना हा प्रकल्प जाचक वाटू लागल्याने, त्यांनीच हा प्रकल्प आजारी पडल्याची चर्चा काही कर्मचारी करीत होते. येथे ४२४ कर्मचारी कार्य करीत होते. त्याच ठिकाणी आज घडीला बोटावर मोजण्याइतकेही कर्मचारी दिसत नाहीत. २०१५ साली या प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनासाठी व्यवस्थापनाने साडेसात कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला होता मात्र या प्रस्तावाकडे फारसे गांभीर्याने कोणी पाहिले नाही. त्यामुळे तांत्रिक मंजुरीच्या चक्रव्युहात हा प्रस्ताव अडकून पडला. फक्त उदगीरची नव्हे तर सीमावर्ती भागात आणि जळकोट, देवणी तालुक्यातही शेतक-यांना दूध उत्पादनाच्या जोड धंद्यासाठी हा प्रकल्प आधारवड होता. आज घडीला त्या प्रकल्पाचा बळी गेला आहे.

त्या प्रकल्पाला पुनरुज्जीवित करण्याऐवजी त्या प्रकल्पासाठी असलेली १३ एकर जमीन, तिचे लचके तोडून आपण ही जमीन कशा पद्धतीने ताब्यात घेऊ यासाठी आता स्पर्धा लागली आहे. विशेष बाब म्हणजे उदगीरला मंत्रीपद असताना एवढा मोठा प्रकल्प बंद पडला जावा, आणि दुर्दैवाने त्याठिकाणी असलेल्या जमिनीचा वाटा करून वेगवेगळ्या संस्थांना, आस्थापनांना दिला जाण्याची चर्चा व्हावी. ही अत्यंत शोकांतिका आहे. शेतक-यांचे कैवारी म्हणून ओळखल्या जाणा-या शरद पवारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शेतक-यांच्या हिताला मूठमाती देऊन कार्यकर्ते पोसण्याचा धंदा चालवला की काय? अशी टीका विरोधकांकडून केले जात आहे.

लाखोंचे भंगार पडून, अनेक वस्तू गायब
शासकीय योजनेतील अनेक वस्तू गायब झाल्या आहेत. आईस फॅक्टरीचे लोखंडी पाइप, भंगाराचे साहित्य जाग्यावर दिसून येत नाही. कधी काळी महाव्यवस्थापक असलेल्या योजनेला आता पूर्णवेळ व्यवस्थापकही नाही! आणि इतर जबाबदार अधिकारीही नाहीत. तेथील अधिका-यांना देण्यात आलेल्या जीप आजही तिथेच आहेत. काही अधिका-यांंच्या मते आता दूध भुकटी प्रकल्प पुन्हा नव्याने कार्यान्वित करायचा झाल्यास जवळपास दहा कोटी रुपयांचा निधी लागेल. बॉयलर आणि अन्य मशनरी आता भंडार झाले आहेत. याची वरिष्ठ पातळीवरुन दखल घेऊन काळजी घेणे गरजेचे आहे. असेही मत जाणकारांतून व्यक्त केले जात आहे.

अजान स्पर्धेच्या मुददयावरून भाजपाची शिवसेनेवर जोरदार टीका!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या