अहमदपूर (रविकांत क्षेत्रपाळे) : हे सरकार शेतक-याच्या खरेच पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. जिल्ह्यात शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे करा पण शेतक-यांना बोलण्यापेक्षा त्यांना त्वरित सरसकट हेक्टरी किमान ५० हजार रुपयांची मदत जाहीर करून, सरकार खरेच शेतक-यांच्या पाठीशी खंबीर उभे आहे हे दाखवून देण्याची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया शेतक-यांतून व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मागच्यावेळी सरकारमध्ये असताना या तालुक्यातील सांगवी येथे दौ-यावर अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी आले असता खरीप पिकांना हेक्टरी २५ हजार ,बागायती शेतक-यांना ५० हजार व फळबागांचे नुकसान झालेल्या शेतक-यांना दीड लाखापर्यंत मदत दिली पाहिजे, असे वक्तव्य केले होते. त्यावेळी त्यांच्या हातात नव्हते पण आता त्यांच्या हातात असल्यामुळे शेतक-यांना तोंडी बोलून धीर देण्यापेक्षा नगदी रुपयांची मदत करणे आता महत्त्वाचे आहे. अहमदपूर तालुक्यात पावसाची वार्षिक सरासरी ही ७८० मि.मी.होती पण यावर्षी तालुक्यात विक्रमी अकराशे मि.मी.पेक्षाही जास्त पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात शेतक-याचे नगदी पीक समजले जाणारे सोयाबीन या पिकाची पावसाने वाट लागली आहे. उत्पन्नात खूप घट झाली आहे.
या बरोबरच कापूसाचीही अनेक शेतक-यांनी लावण केली होती. पीके जोमातही आले होते परंतु उत्तरा महिन्यातील पावसाने त्याचा चक्क खराटा झाला आहे .सोयाबीन व कापसाचे हे दोन्ही पीक शेतक-यांच्या हातचे गेले असून शेतकरी हतबल झाला आहे. त्याची झोप उडाली आहे. आता वर्ष कडेला कसे जाणार, काय खायचे, कपडालत्ता, दवाखाना, शिक्षण, शेतीचा खर्च पुढे कसा करायचा याचीचिंंता आता शेतक-यांना लागली आहे. यावर्षी काही शेतक-यांना निकृष्ट बियाणामुळे दुप्पट खर्च झाला. सोयाबीन खूप चांगले आले. पण अतिपावसाने शेंगा एकेरी लागल्या व उत्पन्नात कमालीची घट झाली .कापूस गेला, सोयाबीन गेले आणि शेतक-याच्या हाती भुस्कट व दुपटने राहिले. मदतीसाठी राज्य सरकारने केंद्राकडे बोट दाखविण्याची आता ही वेळ नाही.
केंद्र देईल की नाही याची वाट न पाहता, राज्यात अडचणी आहेत ,पण आता तिजोरीमध्ये काही आहे की नाही हे सांगत बसण्यापेक्षा, कुठून रुपये उभा करायचे ते तातडीने शेतक-यांना सरसकट अगोदर मदत जाहीर करणे फार महत्त्वाचे आहे. आता शेतक-याचे वर्षातील सर्वात मोठा दसरा-दिवाळी हे सण येत आहेत .जवळ असलेला सर्व पैसा शेतीमध्ये खर्च केला. सुगीच्या दिवसात चांगला पैसा जवळ यायचा पण सध्या तो रिकामा होऊन बसलेला आहे. अशा सणाच्या दिवसात सरकारने सढळ हाताने मदत त्वरित जाहीर करून शेतक-याच्या पाठीशी उभे आहोत हे दाखवून देणे आता गरजेचे आहे. सरकारने अगोदर हेक्टरी मदत जाहीर करून, त्यांना आर्थिक बळ देऊन, पुन्हा शेतक-याचे सांत्वन करीत रहाणे महत्त्वाचे आहे. आता तालुक्यातील जनता आर्थिक मदतीच्या अपेक्षेत आहे.
१0३ कोरोना बाधितांची भर तर दोघांचा मृत्यू