24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeलातूरशेतक-यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

शेतक-यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

एकमत ऑनलाईन

लातूर : राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी, सततचा पाऊस व पुरामुळे शेती पिकामध्ये पाणी साचले जाऊन सोयाबीन, तूर, कपाशी व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. तसेच काही पिकांना जागेवरच कोंबे आलेली आहेत. तरी प्रशासनाने नुकसान झालेल्या सर्व शेती पिकांचे पंचनामे त्वरित करुन प्रस्ताव सादर करावेत. राज्यातील नुकसानग्रस्त सर्व शेतक-यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लातूर व उस्मानाबाद या दोन्हीही जिल्ह्यात पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा व कृषिविषयक योजनांच्या आढावा बैठकीत कृषिमंत्री दादाजी भुसे बोलत होते. यावेळी संसदीय कार्य, पर्यावरण व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे, उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील, औसा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार, उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील, उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गवसाने, उस्मानाबाद जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी घाटगे यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते.

कृषी मंत्री भुसे पुढे म्हणाले की, लातूर व उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने नुकसान झालेल्या सर्व शेतीपिकांचे पंचनामे करून नोंदी घ्याव्यात. या सर्व माहितीचे संकलन करून केंद्र शासनाकडून मदत मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. तसेच नुकसानीबाबत केंद्रीय पथकाने पाहणी करावी याबाबत केंद्राकडे मागणी केली जाणार आहे. राज्य शासन ही सर्व शेतक-यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. पीएम किसान योजनेचा लाभ प्रत्येक शेतक-याला मिळण्यासाठी अधिक गतिमान पद्धतीने काम करावे. महसूल व कृषी विभागाने यासाठी एक संयुक्त मोहीम राबवावी व या मोहिमेच्या माध्यमातून या योजनेच्या लाभापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही. याची दक्षता घ्यावी, असे निर्देश कृषिमंत्री भुसे यांनी देऊन लातूर जिल्ह्यातील तीन लाख १७ हजार शेतक-यांना तर उस्मानाबाद जिल्ह्यातील २ लाख ७९ हजार शेतक-यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत आहे. सर्व शेतक-यांना योजनेचा पहिला हप्ता मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असेही त्यांनी सूचित केले.

खरिप पेरणीच्या सुरुवातीस सोयाबीन बियाणांच्या उगवणीबाबत तक्रारी मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या. या बियाणांची पडताळणी करुन अनेक कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर काही कंपन्याचे परवाने रद्द करण्यात आले. त्यामूळे पुढील पेरणीकरीता शेतक-यांनी स्वत:चे बियाणे तयार करण्यासाठी चांगल्या प्रकारचे बियाणे काढून ठेवावे याबाबत कृषी विभागाने प्रबोधन करावे. माननीय मुख्यमंत्री यांनी ‘विकेल ते पिकेल’ ही योजना सुरु केली असून ग्राहकांची जी मागणी आहे, त्याच पिकाचे उत्पादन शेतक-यांनी घ्यावे यासाठी प्रयत्न केले जाऊन शेतक-यांना सक्षम केले जाणार आहे व ग्राहकांनाही शेतक-यांचा थेट माल पोहोच केला जाणार असल्याची माहिती श्री. भुसे यांनी दिली.

यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार घाडगे पाटील, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार अभिमन्यु पवार, आमदार ज्ञानराज चौगुले यांनी नुकसानीचे पंचनामे त्वरित करणे, पीक विम्याचे ऑफलाईन अर्ज स्वीकारणे, पीककर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करणे, शेततळे, उस्मानाबाद व लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करणे आदी मागण्या करुन त्याबाबत सकारात्मक विचार करावा व शेतक-यांना तात्काळ मदत मिळवून द्यावी, असे आवाहन केले. प्रारंभी लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गवसाने यांनी लातूर जिल्ह्यात सरासरीच्या १०८ टक्के पाऊस झालेला असून ६० पैकी २४ महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे व एकूण ९९ हजार ५५१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती दिली. उस्मानाबाद चे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. घाटगे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरीच्या १०३ टक्के पाऊस झालेला असून २१ मंडळात शंभर टक्के पाऊस झालेला असून सात मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची माहिती दिली तर ४१ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या