लातूर : महाराष्ट्रात आणि लातूर जिल्ह्यातही पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी सतर्क होऊन मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन राज्याच्या वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.
मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गेल्या दोन दिवसापासून लातूर जिल्ह्यातीलही नव्याने कोरोना रुग्ण सापडल्याचे दिसून आले आहे, त्यामुळे जनते पुन्हा सतर्क होण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुस-या लाटेत असंख्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता, त्या तुलनेत कोरोनाच्या तिस-या लाटेत मृत्यूच्या घटना कमी घडल्या असल्या तरी आता नव्याने सुरु झालेल्या चौथ्या लाटेत नेमके काय घडेल याचा अंदाज आत्ताच येणार नाही, त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्याला कोरोना होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे, नागरिकांनी आवश्यकता नसेल तर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळलेले योग्य राहणार आहे.
बाहेर पडताना प्रत्येकाने पुन्हा अनिवार्यपणे मास्कचा वापर करावा, हात स्वच्छ धुवावेत, सॅनिटायझरचा नित्यनियमाने वापर करावा, ज्या नागरिकांनी लसीची दुसरी मात्रा घेतलेली नाही त्यांनी ती ताबडतोब घ्यावी, ज्यांचा तिसरा (बूस्टर ) राहिला आहे त्यांनी तो ताबडतोब घेऊन स्वत:ला सुरक्षित बनवावे, असे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी केले आहे.
प्रशासन, पोलिस आणि आरोग्य यंत्रणेने आवश्यक ती कार्यवाही करून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी असेही निर्देश त्यांनी दिले आहेत. कोरोना न होणे हाच कोरनावर सर्वात महत्वाचा उपचार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.