26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeलातूरतिस-या लाटेच्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे

तिस-या लाटेच्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे

एकमत ऑनलाईन

लातूर : आपल्या देशात पुढील काही महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, असे म्हंटले जात आहे. त्यानुषंगाने लातूर जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचना नुसार कार्यवाही करावी. तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. तरी प्रौढ रुग्णासाठी ही तेवढिच व्यवस्था ठेवावी. व या तिस-या लाटेचा आपल्या जिल्ह्यातील प्रसार अत्यंत नगण्य राहील यासाठी सर्व यंत्रणा सतर्क ठेवावी, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित संभाव्य कोविडची तिसरी लाट पूर्व तयारीच्या आढावा प्रसंगी पालकमंत्री अमित देशमुख बोलत होते. यावेळी पर्यावरण, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार धीरज देशमुख, आमदार अभिमन्यु पवार, महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., महापालिका आयुक्त अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महापालिकेचे विरोधी पक्ष नेते दीपक सूळ, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, आय. एम. ए. अध्यक्ष डॉ. सुरेखा काळे, आयएमएचे सचिव डॉ. हनुमंत किनीकर यांच्यासह नियोजन समिती सदस्य व यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले, प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात यापूर्वीच पाच व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यास सांगितलेले आहे, त्यानुसार त्वरित कार्यवाही पूर्ण झाली पाहिजे. तसेच हे व्हेंटिलेटर चालविण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पुरेसे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले पाहिजे. त्यासाठी आरोग्य यंत्रणेतील सर्व वैद्यकीय अधिकारी व स्टाफचे आयएमएच्या मदतीने प्रशिक्षण पूर्ण करुन घ्यावे असे त्यांनी सूचित केले. उदगीर सामान्य रुग्णालयातील आटीपीसीआर लाभ लवकरात लवकर कार्यान्वित होईल तसेच ट्रॉमा केअरचे काम गतीने झाले पाहिजे त्याप्रमाणेच सामान्य रुग्णालयात किमान ३५ बेड निर्माण करावेत अशा सूचना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या. तसेच कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यात पूरेसा औषधी साठा ठेवावा व जळकोट तालुक्यात चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध कराव्यात असेही त्यांनी सूचित केले. जिल्ह्यात ‘माझे घर लसीकरणयुक्त’ ही मोहीम राबवून लसीकरणाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन आमदार धीरज देशमुख यांनी केले. तर आमदार फंडातून ऑक्सीजन बेड, आयसीयु बेड तसेच अ‍ॅम्ब्युलन्स खरेदी करण्यासाठी निधी देण्यात आला असून त्याची तात्काळ अंमलबजावणी औसा विधानसभा मतदार संघात करावी, अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी केली.

जिल्हाधिकारी पृथ्वीराज म्हणाले की, राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १०० आयसीयु बेड व ५०० ऑक्सीजन बेडची तयारी केली आहे. तसेच खाजगी रुग्णालयात १०० आयसीयु बेड उपलब्ध केले जाणार आहेत. लहान मुलासाठी आवश्यक असणारा औषधी साठा निर्माण केला जात असून तो लवकरच प्राप्त होईल तसेच लहान मुलांना हँडल करण्यासाठी आरोग्य कर्मचारी व डॉक्टर्सना प्रशिक्षण दिले जात आहे असे सांगून दुस-या लाटे पेक्षा ५० टक्के अधिक आयसीयू व ऑक्सिजन बेड वाढविले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. व प्रशासन तिस-या लाटेच्या अनुषंगाने पूर्वतयारी करत असून या लाटेचा अधिक परिणाम होणार नाही याची दक्षता घेतली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. सुरेखा काळे, सचिव डॉक्टर किणीकर नियोजन समिती सदस्य व अन्य मान्यवर यांनी तिस-या लाटेच्या अनुषंगाने आपले विचार मांडले. या बैठकीचे सूत्रसंचालन सहाय्यक पुरवठा अधिकारी महेश सावंत यांनी केले व शेवटी आभार ही मानले.

उदगीर येथील आरटीपीसीआर लॅब एका महिन्यात कार्यान्वित होईल
उदगीर सामान्य रुग्णालयात नव्याने सुरु होत असलेल्या आरटीपीसीआर लॅब एका महिन्यात कार्य नीट केली जाणार आहे त्यामुळे त्या चार-पाच तालुक्यातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे. आरोग्य यंत्रणेने तिसरी लाट येण्यापूर्वी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करुन घ्यावे. दुसरी लाट ओसरल्यानंतर लसीकरण करुन घेण्याची प्रक्रिया संथ झाल्याचे दिसून येत आहे. तरी लसीकरणाची प्रक्रिया अधिक गतिमान करावी, अशा सूचना पालकमंत्री देशमुख यांनी देऊन जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालयांची पुढील पंधरा दिवसात एक स्वतंत्र बैठक लावावी असेही सांगितले.

बालकांसाठीची सर्व औषधे खरेदी करुन ठेवा
तिस-या लाटेच्या पूर्वी जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेकडे बालकासाठी आवश्यक असलेले पुरेसा औषधी साठा तसेच साहित्य खरेदी करुन ठेवले गेले पाहिजे. तसेच तिसरी लाट बालकांना धोकादायक जरी असली तरी प्रौढांसाठी ही तेवढीच व्यवस्था करुन ठेवावी. कारण सध्या देशात व राज्यात डेल्टा प्लस हा कोरोना चा विषाणू झपाट्याने पसरत असल्याचे दिसून येत आहे. त्या विषाणूचा आपल्या जिल्ह्यात प्रादुर्भाव अत्यंत कमी प्रमाणात राहावा यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे, असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले.

जगभरातील ५० देशांना हवेत को-विन अ‍ॅपचे तंत्रज्ञान

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या