लातूर : गावाचे गावपण टिकवत गाव आधुनिक बनवा. त्यासाठी सर्व अत्यावश्यक सुविधा पुरवण्यापासून मोफत वाय-फाय पर्यंतच्या सुविधा कशा सुरू करता येईल याचा विचार करावा. एकत्रित प्रयत्नांतून गावाचा सर्वांगीण विकास करावा, अशी अपेक्षा आमदार मा. धिरज विलासराव देशमुख यांनी मंगळवारी (ता. 19) व्यक्त केली. तरुणांचा आणि महिलांचा गावाच्या विकासात सहभाग वाढत आहे. हा बदल विकासाचे द्योतक आहे, असेही ते म्हणाले.
ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल सोमवारी (ता. 18) जाहीर झाले. या निकालात जिल्ह्याबरोवरच लातूर ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसच्या विचारांचा झेंडा फडकला आहे. यातील बहुतांश विजयी उमेदवारांचे आमदार धिरज देशमुख यांनी सोमवारी (ता. 18) अभिनंदन केले. तर उर्वरित नवनिर्वाचित उमेदवारांचे मंगळवारी (ता. 19) अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे बाभळगावातील निवासस्थानी अनौपचारिक ‘कौतुक सोहळा’ रंगल्याचे वातावरण आज दिवसभर पहायला मिळाले.
आमदार धिरज देशमुख यांनी पॅनल प्रमुख आणि नवनिर्वाचित उमेदवारांशी गावातील समस्यांवर चर्चा केली. ग्रामविकासाच्या योजना घरोघरी पोहोचवाव्यात. गावातील मंदिरे आणि महत्त्वाच्या चौकाच्या ठिकाणी वाय-फाय सुविधा सुर कराव्या. बचतगट, वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून महिलांचा गाव विकासातील सहभाग वाढवावा. सौरऊर्जा, स्मार्ट योजना, विकेल ते पिकेल अशा योजनांची अंमलबजावणी करावी आणि यातील लाभार्थ्यांची संख्या वाढवावी, अशी वेगवेगळी कामे करीत आदर्श ग्रामपंचायतीकडे वाटचाल करावी, अशी अपेक्षाही आमदार धिरज देशमुख यांनी याप्रसंगी व्यक्त केली.