22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूरमासिक पाळीसंदर्भातील सामाजिक दृष्टीकोन बदलण्याची गरज

मासिक पाळीसंदर्भातील सामाजिक दृष्टीकोन बदलण्याची गरज

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
मासिक पाळी संदर्भात समाजामध्ये विविध गैरसमज आहेत.महिलांच्या आरोग्याशी हा विषय निगडित असून त्याकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टिकोन बदलत नाही. मासिक पाळी हा जाणीव जागृतीचा विषय आहे. महिलांच्या आरोग्यासाठी या संदर्भातील सामाजिक दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे, असे मत आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी व्यक्त केले.

अक्का फाऊंडेशनच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त सुरु करण्यात आलेल्या प्रोजेक्ट आनंदीच्या शुभारंभप्रसंगी ‘ती’ फाउंडेशनच्या संस्थापक, आमदार डॉ. भारती लव्हेकर बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार श्रीमती रुपाताई पाटील निलंगेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी मंचावर उपस्थित होते. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणा-या या उपक्रमाच्या शुभारंभास खासदार सुधाकर शृंगारे, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, गोविांद केंद्रे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, दिलीपराव देशमुख, गणेश हाके ,युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, प्रेरणा होनराव, शैलेश लाहोटी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्यासह डॉक्टर्स, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार डॉ. लव्हेकर म्हणाल्या की, प्रत्येक घरासाठी हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. देशातील ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते.यापैकी केवळ १५ टक्के महिलांना सॅनिटरी पॅड मिळतो. इतर महिलांनाही सॅनिटरी पॅड मिळावे यासाठी पाच वर्षांपूर्वी मी सॅनिटरी पॅड बँक सुरू केली. आज १ लाख ९ हजार ३६० महिला आणि ११८ शाळा या बँकेच्या सदस्य आहेत.दर महिन्याला प्रत्येक महिला व युवतीस या माध्यमातून १० पॅड मोफत उपलब्ध करून दिले जातात,असे त्या म्हणाल्या.

प्रास्ताविकात आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी या उपक्रमाची माहिती दिली. पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी महिलांच्या आरोग्यासाठी या विषयात लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली. अध्यक्षीय समारोपात माजी खासदार श्रीमती रूपाताई पाटील निलंगेकर यांनी हा विषय नाजूक असल्याचे सांगत त्याकडे कानाडोळा केला जात असल्याचे मत व्यक्त केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. अक्का फाउंडेशनचे कार्य दाखवणार माहितीपटाचे सादरीकरण करण्यात आले. भाग्यश्री कौळखेरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या