22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeलातूर‘नीट’ परीक्षेने गजबजली शिक्षण पंढरी

‘नीट’ परीक्षेने गजबजली शिक्षण पंढरी

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
‘नीट’ची परीक्षा रविवार दि. १७ जुलै रोजी लातूर जिल्ह्यातील ४२ केंद्र झाली. परीक्षेसाठी २१ हजार ९२६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. परीक्षेदरम्यान एकही गैरप्रकार किंवा विद्यार्थ्यांना अडचण येईल, अशी घटना घडली नाही. जिल्ह्यातील सर्वच परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली, असे या परीक्षेचे समन्वयक प्राचार्य गिरीधर रेड्डी यांनी सांगीतले. ‘नीट’ परीक्षेचा रविवार लातूर शहरासाठी एक वेगळीच चलहपहल असणारा ठरला. ‘नीट’मुळे शिक्षणाची पंढरी असलेले लातूर शहर अक्षरश: गजबजले होते.

गेल्या रविवारी आषाढी एकादशी होती. त्यामुळे तमाम भक्तांची माऊली विठ्ठलाची पंढरी आणि संपुर्ण महाराष्ट्र विठ्ठलाच्या भक्तीने गजबजला होता. वारक-यांनी पंढरीच्या पांडुरंगाच्या भक्तीत लीन होत विठ्ठल नामाचा गजर संपूर्ण महाराष्ट्रात केला होता. लातूर शहरातही माऊलीच्या भक्तांनी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांनी संपूर्ण शहर भक्तीमय झाले होते. यंदाच्या रविवारी ‘नीट’ परीक्षेच्या निमित्ताने विद्यार्थी शिक्षणांची पंढरी असलेल्या लातूर शहरात आले होते. ‘नीट’ परीक्षेने लातूरची शिक्षण पंढरी अक्षरश: गजबजून गेली होती.

जिल्ह्यातील ४२ केंद्रांवर दुपारी २ ते ५ यावेळेत ‘नीट’ परीक्षा झाली. कोरोना संपलेला नसल्याने परीक्षा केंद्राचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. कोरोनाच्या संदर्भात असलेल्या सर्व उपाय योजना सर्वच केंद्रांवर करण्यात आल्या होत्या. एकाच वेळी विद्यार्थ्यांची गर्दी होवू नये म्हणुन सकाळी ११ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला गेला. दीड वाजेपर्यंत हा प्रवेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वत:सोबत कोरोनाचा प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून मास्क, सॅनिटायझर, ओळखपत्र, अ‍ॅडमीट कार्डही आणलेले होते.

‘नीट’ परीक्षार्थ्यांची यंदा प्रथमच बायोमॅट्रीक्स झाली. प्रत्येक वर्गात परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्ही कॅमे-याद्वारे नजर होती. परीक्षा सुरळीत पार पडावी, यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची जय्यत तयारी होतीच. परीक्षेदरम्यान एकाही विद्यार्थ्याला अ‍ॅडमिट कार्डसंदर्भात अडचण आली नाही. जिल्ह्यातील सर्वच परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीत, शांततेत पार पडली. एकही गैर प्रकार घडला नाही, असे लातूरच्या नीट परीक्षेचे समन्वयक प्राचार्य गिरीधर रेड्डी यांनी सांगीतले. या परीक्षेचे दुसरे समन्वयक प्राचार्य सचिदानंद जोशी होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या