Tuesday, October 3, 2023

अतिवृष्टीचे रखडलेले अनुदान अखेर शेतक-यांच्या खात्यावर जमा

औसा : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातील खरीप पिकांच्या भरपाईपोटी शासनाने दोन टप्प्यात अनुदान उपलब्ध करून दिले होते. यापैकी काही शेतक-यांना अनुदान वाटप झाले नसल्याने हे अनुदान वाटप करण्याबाबत औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडे शेतक-यांनी मागणी केली होती. आ. अभिमन्यू पवार यांनी पाठपुरावा केल्याने रखडलेले हे अनुदान अखेर शेतक-यांच्या खात्यावर जमा झाले आहे.

गतवर्षी अतिवृष्टीमुळे शेतक-यांच्या खरिप पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. याबाबत आमदार अभिमन्यू पवार यांनी त्यावेळी मतदारसंघातील शेतक-यांच्या बांधावर जावून या नुकसानीची पाहणी करित या नुकसानीचा पंचनामा करून शेतक-यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती. राज्यात सत्तास्थानाचे गलबते सुरू असताना राज्यपालांनी खरिप पिकासाठी ८ हजार रुपये व फळबागासाठी हेक्टरी १८ हजार अनुदान तात्काळ देण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने तालुक्यातील बहुतांश शेतक-यांना अनुदान मिळाले. मात्र या अनुदापासुन औसा तालुक्यातील ८ हजार १०२ शेतक-यांचे ५ कोटी ७५ लाख २३ हजार ८३२ रुपयांचे अनुदान रखडले होते. याबाबत आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडे बेलकुंड (ता. औसा) येथील शेतक-यांनी अनुदान मिळाले नसल्याची तक्रार मांडली होती.

याबाबत आ. पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे
अनुक्रमे जानेवारी व फेब्रुवारीमध्ये झालेल्या आढावा बैठकीत हे अनुदान देण्याची मागणी वारंवार मागणी केली होती.
याबरोबरच नागपूर आणि मुंबई येथील अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून सभागृहात शेतक-यांच्या प्रश्नावर चर्चेत राज्यपालांनी घोषित केलेले अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे शेतक-यांचे प्रलंबित अनुदान देण्याबाबत पाठपुरावा केला होता.

अखेर या पाठपुरव्यास यश आले असून रखडलेले हे अनुदान शेतक-यांच्या खात्यावर जमा झाले आहे. यामध्ये ६ हजार ४७३ शेतक-यांचे ४ कोटी ४७ लाख ३५ हजार ४४० रुपये संबंधित शेतक-यांच्या खात्यावर जमा झाले असून, १ हजार ६२९ शेतक-यांनी बँकेचे खाते नंबर दिले नसल्याने त्यांचे १ कोटी २७ लाख ८८ हजार ३९२ रुपये अनुदान औसा तहसीलदार यांच्याकडे जमा आहेत. कोरोनामुळे आर्थिक संकटाचा सामना शेतक-यांना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शेतक-यांना या अनुदानामुळे दिलासा मिळणार आहे.

त्या शेतक-यांनी तलाठ्यांकडे खाते नंबर द्यावेत : आ. पवार
१ हजार ६२९ शेतक-यांचे खाते नंबर उपलब्ध नसल्याने त्यांचे अनुदान खात्यावर जमा झाले नाहीत. त्यांचे अनुदान औसा तहसीलदार यांच्याकडे जमा असून, अशा शेतक-यांनी संबधित तलाठ्यांकडे संपर्क साधून आपले खाते नंबर द्यावेत. जेणेकरुन त्यांचे अनुदान खात्यावर जमा होईल, असे आवाहन आ. अभिमन्यू पवार यांनी केले आहे.

Read More  दुस-या व तिस-या टप्प्यातील मानवी चाचणीचा मार्ग मोकळा

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या