25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeलातूरधोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर

धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर

एकमत ऑनलाईन

लातूर : एजाज शेख
पावसाळ्यात जीर्ण व धोकादायक इमारती कोसळून जीवित व वित्त हानी होऊ शकते. हे त्या इमारतींच्या मालकांना आणि लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाला चांगले कळते पण वळत नाही, अशी परिस्थिती लातूर शहरात सध्या दिसून येत आहे. वर्षानुवर्षे नोटीसा बजावल्या जातात परंतू, पुढे कारवाई होत नसल्याने शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर झाला आहे. लातूर शहरात महानगरपालिकेचे ‘ए’, ‘बी’, ‘सी’, आणि ‘डी’, असे चार क्षेत्रीय कार्यालय आहेत. त्यातील सर्वाधिक ६१ धोकादाय इमारती ‘डी’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आहेत. ‘सी’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत १९, ‘बी’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत केवळ गोरक्षण ही एकमेव धोकादायक इमारत तर ‘ए’ क्षेत्रीय कार्यालय धोकादायक इमारतमुक्त आहे.

शहरात एकुण ८१ धोकादायक इमारती आहेत. असे असताना महानगरपालिका प्रशासनाने केवळ शंकर अंबादास पारशेवार- गंजगोलाई, अलका विलास पारशेवार गंजगोलाई, शशिकांत नागनाथअप्पा केराळे- सराफ लाइन, बजरंग नंदलाल वर्मा- मलंग गल्ली, अशोककुमार शरय्या मामडगी- नांदेड रोड, महानंदाबाई काशिनाथ अंकलकोटे कामदार रोड, विनोद बजरंगलाल राठी- गुजराथी गल्ली, लक्ष्मीकांत रंगनाथ ताथोडे- गुजराथी गल्ली, शांतीकुमार बिष्टिचंद कुचेरिया- गुजराथी गल्ली, पुष्पा दत्तात्रय, निर्मला राजाराम कोटलवार- लोखंड गल्ली, गुणवंत शिवलिंग झिनूरे- लोखंड गल्ली, हाजी खमरोद्दीन हाजी रियाजोद्दिन खोरीवाले कापड लाइन, इस्माईल अब्दुल रज्जाक घंटे- गंजगोलाई, राजगोपाल गोविंदलाल अग्रवाल- मेन रोड, गंजगोलाई, श्रीहरी रामचंद्र बलदवा- सराफ लाइन, सुरज मारुती सौदागर – सराफ लाइन, सय्यद अन्सार युसुफ मेन रोड, लातूर, स्मिता जयवंतशेठ चापसी मेन रोड, लातूर, बीना चंद्रकांत घोडके- अण्णा भाऊ साठे चौक, या १९ धोकादायक इमारत मालकांना नोटीसा दिल्याचे महानगरपालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. तर सर्वांनाच नोटीसा दिल्याचे क्षेत्रीय अधिका-यांचे म्हणणे आहे.

ज्या मालमत्ताधारकांच्या इमारतींचा समावेश धोकादायक इमारतींत आहे. त्यांनी या इमारती तात्काळ दुरुस्त कराव्यात. आगामी काळात इमारत कोसळून काही जीवित हानी झाली तर त्यास लातूर शहर महानगरपालिका जबाबदार असणार नाही, अशा आशयाच्या नोटिसा संबंधित मालमत्ताधारकांना देण्यात आल्या आहेत. संबंधितांनी आपापल्या धोकादायक इमारती तात्काळ दुरुस्त कराव्यात, असे त्यांना सुचित करण्यात आले आहे.

धोकादायक इमारती आता अतिधोकादाय झाल्या
दरवर्षीच्या पावसाळ्यात महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने त्याच त्या धोकादायक इमारत मालकांना नोटीसा बाजावून आपली जबाबदारी संपली, अशी भूमिका घेतली जाते. गत वर्षी ज्या धोकादायक इमारतींना नोटीसा दिल्या होत्या या वर्षीही त्याच अतिधोकादाय झालेल्या इमारतींना नोटीसा देण्यात आल्या आहेत. नोटीसांच्या पुढे काहींच कारवाई होत नसल्याने अशा इमारतींचे मालकही पुढच्या वर्षी आणखी एकादी नोटीस येईल तेव्हा बघु, अशा भुमिकेत असल्याचे दिसते.

जबाबदारी यांचीही नाही आणि त्यांचीही… मग कोणाची?
शहरातील हनुमान चौक ते गंजगोलाई या मेन रोडवर काही धोकादायक इमारती आहेत. या इमारतींचा इमारत मालक सध्या उपयोग करीत नाहीत. त्यामुळे त्या इमारती कुलपबंद आहेत. विशेष म्हणजे या इमारत मालकांनी इमारतीवर फलक लावले आहेत. त्या फलकाचा मजकुर असा… ही इमारत धोकादायक आहे. कधीही पडू शकते. त्यामुळे येथे कोणी बसू नये. काही बरे वाईट झाल्यास इमारत मालक जबाबदार राहणार नाही. फलक लावून असा मजकुर लिहिला म्हणजे इमारत मालकाची बजाबदारी संपली आणि महानगरपालिकेने अशा इमारत मालकांना पाटविलेल्या नोटीसीत संबंधीतांनी धोकादायक इमारती तात्काळ दुरुस्त कराव्यात. आगामी काळात इमारत कोसळून काही जीवित हानी झाली तर त्यास लातूर शहर महानगरपालिका जबाबदार असणार नाही. म्हणजे महानगरपालिकेचीही जबाबदारी संपली. मग या धोकादायक इमारतींची जबाबदारी आहे तरी कोणाची?, हा खरा प्रश्न आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या