लातूर : प्रतिनिधी
यंदाच्या मृगापाठोपाठ आर्द्रा
नक्षत्रातही लातूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला नाही. ६ जुलैपासून पुनर्वसू नक्षाला प्रारंभ झाला. या नक्षत्राततरी पाऊस पडेल, अशी अपेक्षा सर्वांनाच होती. मात्र गेल्या आठ दिवसाच्या खंडानंतर दि. ८ जुलै रोजी पावसाचे पुनरागमन झाले आहे. लातूर शहरासह जिल्ह्याच्या काही भागात पावसाला सुरुवात झाली. लातूर शहरात सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. या पावसने शेतक-यांसह सर्वांच्या आशा पल्लवीत झाल्या असून पेरण्यांना वेग येईल, असे वातावरण निर्माण झाले आहे. गत वर्षी प्रमाणेच यंदाही लवकर व भरपूर पाऊस असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यामुळे शेतक-यांनी एप्रिल-मे चे कडक ऊन अंगावर घेत शेत-शिवार खरीपाच्या पेरणीसाठी तयार करुन ठेवले. वर्तविलेल्या अंदाजानूसार यंदाच्या मृृग नक्षत्रात मान्सूनच्या पावसाचे आगमन झाले. दोन-तीन मध्यम स्वरुपाचे पाऊस पडल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली.
याच पावसावर काही शेतक-यांनी पेरण्या केल्या मात्र पेरलेले उगवले नाही तोवर पावसाने उघडीप दिली. पावसाचा मोठा खंड पडला. त्यामुळे पेरणी केलेल्या शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट आले. तर ज्यांनी पेरणी केली नाही ते पेरणीच्या प्रतिक्षेत आहेत. मृग नक्षत्राने घोर निराशा केल्यानंतर आर्द्रा नक्षत्रावर सर्वाच्या अपेक्षा होत्या. त्यातच हवामान खात्याच्या
वेगवेगळ्या अंदाजाने शेतकरी धास्तावले होते. आर्द्रा नक्षत्रानेतही हलका ते मध्यम स्वरुपाचा एक-दोनदा पाऊस पडला. पावसाने याही नक्षत्रात पाठ फिरवली. आता पुनर्वसू नक्षात्रातरी चांगला पाऊस पडेल, अशी अपेक्षा आहे.
सुमारे आठ दिवसांनंतर पावसाने लातूर आणि आसपासच्या परिसरात हजेरी लावली. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस दुपारी ३ वाजेपर्यंत सुरुच होता. त्यानंतर पाऊस थांबला. दुपारी ४ वाजण्याच्या सूमारास काही प्रमाणात उन्ह पडले आणि सायंकाळी पुन्हा आकाश ढगांनी व्यापले. सायंकाळी पावसाची रिमझीम सुरु झाली ती रात्री उशिरापर्यंत सुरुच होती. यंदा मृग व आर्द्रा नक्षत्रात पडलेला पाऊस असमान होता. कुठे पडला तर कुठे नाही, कुठे रिमझीम तर कुठे मध्यम, कुठे मध्यम तर कुठे जोरदार असा पाऊस पडत गेला. त्यामुळे जिल्ह्यातील काही महसूल मंडळात ब-यापैकी तर काही महसुल मंडळात अत्यल्प पाऊसाची नोंद झाली. त्याचा फटका शेतक-यांना बसला. काही ठिकाणी पेरण्या झाल्या तर काही ठिकाणी पेरण्या झाल्याच नाहीत.