24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeलातूरकिलबिलाटाने शाळा गजबजल्या

किलबिलाटाने शाळा गजबजल्या

एकमत ऑनलाईन

लातूर : ग्रामीण भागातील पालकांच्या संमतीने इयत्ता ५ वी ते १२ वी चे व शहरातील ८ वी ते १२ वी चे ऑफलाईन वर्ग सोमवार दि. ४ ऑक्टोबर पासून सुरू झाले. पहिल्याच दिवशी शाळा व्यवस्थापन समितीने नियोजन करून शाळेत येणा-या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देवून स्वागत केले. त्यामुळे पहिल्याच दिवशी ६१२ शाळेमध्ये ९३ हजार ७४० विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत पोहचले. तब्बल दिड वर्षा नंतर विद्यार्थ्यांचे शाळेत आगमन झाल्याने त्यांच्या किलबिलाटाने शाळा गजबजून गेल्या.

लातूर जिल्हयातील कोरोनाचा प्रभाव पाहता यावर्षी शिक्षण विभागाने दि. १५ जून पासून ऑनलाईन शाळा सुरू करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार इयत्ता १ ली ते १२ वी चे ऑनलाईन वर्ग शाळांनी सुरू केले. कोरोनाचा घटता दर पहाता शिक्षण विभागाने पालकांची मंजूरी घेवूनच ग्रामीण भागात दि. १५ जुलै पासून इयत्ता ८ वी ते १२ वी वर्गचे सुरू झाले. सध्या कोरोनाचा घटता दर पाहता ग्रामिण भागात दि. ४ ऑक्टोबर पासून इयत्ता ५ वी ते १२ वी तर शहरी भागात ८ ते १२ वी चे वर्ग सुरू झाले आहेत. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे सॅनिटायजेशन, ऑक्सिजन लेवल, ताप तपासून त्यांना गुलाब पुष्प देऊन शाळेत प्रवेश देण्यात आला. शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थी आनंदात होते.

लातूर जिल्हयात इयत्ता ५ वी ते १२ पर्यंतच्या ६४२ शाळा असून ग्रामीण भागातील ४९६ शाळेपैकी ४७३ शाळा दि. ४ ऑक्टोबर रोजी सुरू झाल्या. पहिल्या दिवशी १ लाख ६८ हजार ५०१ विद्यार्थ्यांपैकी ७२ हजार २४५ विद्यार्थी उपस्थित होते. तर शहरी भागातील ८ वी ते १२ वी च्या १४६ शाळापैकी १३९ शाळा सुरू झाल्या. या शाळेतील ६३ हजार ३९३ विद्यार्थ्यांपैकी २१ हजार ३९५ विद्यार्थी शाळेत दिड वर्षानंतर पहिल्यांदाच उपस्थित राहिले. त्यामुळे पहिल्या दिवशी ६१२ शाळेमध्ये ९३ हजार ७४० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शाळेत पोहचून शिक्षण घेतले.

शाळांची अधिका-यांनी केली पाहणी
लातूर जिल्हयात सोमवार दि. ४ ऑक्टोबर पासून ग्रामीण भागातील पालकांच्या संमतीने इयत्ता ५ वी ते १२ वी चे, तर शहरी भागातील ८ वी ते १२ वी चे ऑफलाईन वर्ग सुरू झाले. शाळा सुरू होणार असल्याने शाळा व्यवस्थापन समितीने शाळेत शासनाच्या सुचनांचे पालन केले का याची पाहणी अधिका-यांनी प्रत्यक्ष शाळेत जाऊन केली. तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहानही दिले.

गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत
शासन आदेशाचे पालन करून, पालक सभेतील निर्णयानुसार, पालकांच्या लेखी संमतीने स्वामी विवेकानंद विद्यालयात इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग सोमवार दि. ४ ऑक्टोबर पासून उत्साहात सुरुवात करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी आणि पालकांचा उत्साह दिसून आला. आठवी ते दहावीतील जवळपास ६० टक्के पेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे सॅनिटायजेशन, ऑक्सिजन लेवल, ताप तपासून घेऊन शाळेत प्रवेश देण्यात आला. त्यानंतर गुलाब पुष्प देऊन सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण ही करण्यात आले. आजचा पहिला दिवस अगदी मजेत गप्पागोष्टी करीत, मागील दीड वर्षातील दीड वर्षातील राहिलेला अभ्यास या सर्व गोष्टी सोडून मुलांना समजून घेणे, त्यांच्या अडचणी जाणून घेणे, त्यांना बोलते करणे, त्यांचे समुपदेशन करणे, यासह पहिला दिवस अविस्मरणीय करण्यावर भर देण्यात आला. मुलांनी पहिला दिवस खूप आनंदाने घालवला, अशी माहिती स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक गोविंद शिंदे यांनी दिली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या