लातूर : प्रतिनिधी
गेल्या १८ दिवसांपासून सुरु असणा-या येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवाची फटाक्यांच्या आतिषबाजीने सांगता झाली. सोमवारी रात्री हजारो रंगीबेरंगी फटाक्यांच्या आतिषबाजीने देवस्थानचा आसमंत उजळून निघाला महाशिवरात्रीच्या दिवशी दि. १८ फेब्रुवारी रोजी यात्रेचा शुभारंभ झाला. या कालावधीत लाखो भाविकांनी श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वरांचे दर्शन घेतले. यात्रेनिमित्त बच्चेकंपनी व तरुणांनी आनंदनगरीचा आनंद लुटला. या कालावधीत कीर्तन- भजन, श्री सिद्धेश्वर कृषी महोत्सव व पशुप्रदर्शन, १००१ महिलांकडून रुद्राभिषेक, पाककला स्पर्धा आदी उपक्रम झाले. या उपक्रमांनाही भरभरुन प्रतिसाद मिळाला. देवस्थानच्या वतीने आयोजित कुस्ती स्पर्धेला राज्यातील मल्लांनी भरभरुन प्रतिसाद दिला.
सोमवारी रात्री परंपरेप्रमाणे फटाक्यांच्या आतिषबाजीने यात्रेची सांगता झाली. रात्री ८ वाजता प्रशासक सचिन जांबुतकर व मधुकर गुंजकर यांच्या हस्ते आतिषबाजीस प्रारंभ झाला. बराच काळ आतिषबाजी सुरु होती. आतिषबाजीच्या माध्यमातून विविध देखावे सादर करण्यात आले. यात शिवलिंग, श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानचे नाव, विविध प्रकारच्या आकृत्या यांचा समावेश होता. या आतिषबाजीने उपस्थित भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. यावेळी देवस्थानचे प्रशासक तथा निरीक्षक सचिन जांबुतकर, ज्येष्ठ विश्वस्त विक्रमतात्या गोजमगुंडे,अशोक भोसले, विशाल झांबरे, ओम गोपे, यांच्यासह विश्वस्त मंडळातील सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यात्रा काळात सहकार्य केल्याबद्दल देवस्थानच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.