अहमदपूर : तालुक्यातील शिंदगी बु. या भागात शेतक-यांंना पाण्यासाठी कुठलीही सुविधा नाही या भागातील शेतक-यांची महत्त्वाची अडचण लक्षात घेऊन आमदार बाबासाहेब पाटील यांनी जलसंधारण विभागाकडे पाठपुरावा करून शिंदगी बु. येथे साठवन तलावासाठी मान्यता मिळवली असून या पाण्यामुळे २०० हेक्टर जमीन ओलिताखाली येऊन हा ओसाड भाग सुजलाम -सुफलाम होणार आहे. तालुक्यातील खंडाळी साठवण तलाव व हंगरगा साठवून तलाव काही कारणास्तव हे होऊ शकले नाहीत. येथे पाणी उपलब्ध आहे. येथील उपलब्ध असलेले पाणी शिंंदगी बु. येथील साठवण तलावासाठी उपयोगात आणण्यात येणार आहे. यामुळे या डोंगराळ, माळरान भागातील या पाण्याचा उपयोग येथील शेतक-यांना होऊन येथे हरितक्रांती झाल्याचे पाहायला मिळणार आहे.
या साठवण तलावामुळे शेतक-यांना चांगलाच फायदा होणार आहे. सिंंदगी बु. या गावातील शेतक-यांची साठवण तलाव व्हावे यासाठी अनेक वर्षापासूनची आग्रही मागणी होती. आमदार बाबासाहेब पाटील या डोंगराळ भागात साठवण तलाव व्हावा यासाठी गेल्या दीड ते दोन वर्षापासून सतत प्रयत्न करीत होते. शेवटी त्यांच्या या प्रयत्नाला आता यश आले असून यामुळे या भागाचा कायापालट होऊन विकास होण्यासाठी मदत होणार आहे. यामुळे शेतक-यांचे उत्पन्न वाढणार असून यांना निश्चीतच आता सुखाचे दिवस पाहायला मिळणार आहेत. शिंदगी बु साठवण तलावाच्या कामासाठी जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता नाथ यांचेही चांगले सहकार्य मीळाल्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. मृद व जलसंधारण विभाग लातूरचे कार्यकारी अभियंता ए. एस. कांबळे व उपअभियंता सुरेंद्र जाधव यांचे सहकार्यानेच साठवण तलावाचे काम पूर्ण होणार असून यासाठी किमान दहा ते पंधरा कोटी रुपये खर्च येणार असून यामुळे या भागातील पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचे सांगण्यात आले.