लातूर : लातूर महापालिकेच्या वतीने महापालिकेच्या हद्दीत भूमिगत गटार योजना अंतर्गत शहराच्या उत्तर भागात एक व दक्षिण भागात एक असे दोन एसटीपी (सांडपाणी पुनर्वापर) प्रकल्प प्रस्तावित करावेत. यापूर्वी या प्रकल्पासाठी प्रस्तावित केलेला निधी हा सन २०१८ च्या डीएसआर प्रमाणे होता. तरी सध्याच्या डीएसआर प्रमाणे एसटीपी प्रकल्पाचा नियोजन आराखडा तयार करुन शासनाला सादर करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले.
येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित महानगरपालिकेच्या भूमिगत गटार योजना आढावा बैठकीत पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, एमजीपीचे अभियंता पाटील, स्वामी महापालिकेचे नगर अभियंता दिलीप चिद्रे आदि उपस्थित होते.
पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की, लातूर शहरातील सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी एक व्यवस्थित योजना निश्चित करावी. त्यासाठी शहराच्या उत्तर भागात वरवटी येथील जागा निश्चित केलेली आहे़ तर शहराच्या दक्षिण भागात कव्हा अथवा इतर जागा निश्चित करण्याबाबत महापालिकेने त्वरित कार्यवाही करावी. लातूर महानगरपालिकेने सुधारित
डीएसआर प्रमाणे शासनाकडे सविस्तर आराखडा प्रस्तावित करावा व योजना मंजूर करून घ्यावी. तसेच योजनेची दोन टप्प्यांत विभागणी करुन टप्पा निहाय कामे सुरू करावीत असेही निर्देश श्री. देशमुख यांनी दिले.
लातूर भुयारी गटार योजनेसाठी चांगला प्रस्ताव ७५० कोटीचा होता परंतु एसटीपी प्रकल्पासाठी १३९.४२ कोटी निधी मंजूर केला होता. परंतु वरवटीपर्यंत पाईपलाईन ८ किलोमीटर घेऊन जावी लागणार असल्याने त्या करता किमान २२ कोटीचा वाढीव खर्च अपेक्षित असल्याची माहिती महापौर गोजमगुंडे यांनी दिली. या प्रकल्पाची पूर्वीची टेंडर प्रक्रिया रद्द करुन वाढीव मागणीसह प्रस्ताव शासनाला सादर केला असल्याची माहिती ही त्यांनी दिली.
तसेच एमजीपी चे अभियंता पाटील यांनी एसटीपी प्रकल्पासाठी मंजूर असलेल्या एकूण १३९ कोटी निधीमध्ये शहरातील गटारीमधील सर्व पाणी पाईपलाईनद्वारे वरवटी भागापर्यंत घेऊन जाऊन त्या ठिकाणी त्यावर प्रक्रिया करणे प्रस्तावित असल्याचे सांगितले. ही योजना लातूर शहराची सन २०३४ पर्यंतची लोकसंख्या ग्राह्य धरुन करण्यात आलेली आहे. तसेच हा प्रस्ताव सन २०१८ मध्ये त्यावेळच्या डीएसआर प्रमाणे सादर केला होता त्यामुळे आजच्या डीएसआरप्रमाणे याच्यामध्ये वाढ करावी लागेल असेही त्यांनी सांगितले़ यावेळी स्वामी यांनी पॉवर पॉइंटद्वारे एसटीपी योजना व वरवटी येथील सांडपाणी प्रकल्पाची माहिती दिली.
पुढील २५-३० वर्षांचा विचार करावा
महापौर व महापालिका आयुक्तांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत इतर महापालिकेच्या हद्दीत राबविण्यात आलेल्या भूमिगत गटार योजना व सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाची माहिती घ्यावी व लातूर शहरासाठी पुढील पंचवीस तीस वर्षाचा विचार करुन नियोजन आराखडा तयार करुन योजना प्रस्तावित करावी व ही योजना पुढील काळात आपग्रेड करता येईल या पद्धतीने तयार करावी अशीही सूचना श्री. देशमुख यांनी केली.