लातूर : प्रतिनिधी
टेंभूर्णी-बार्र्शी-येडर्शी-मुरुड-लातूर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागकडून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणकडे वर्ग करुन रस्त्याचे चौपदरीकरण करावे, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
टेंभूर्णी-बार्शी येडशी मुरुड-लातूर हा रस्ता जेएनपीटी बंदर, विशाखापट्टणम बंदर या प्रमुख राष्ट्रीय स्तारावरील दोन बंदरे व औद्योगीक शहर जोडणारे प्रमुख आराखडयाचा महाराष्ट्रातील महत्वाचा भाग आहे. सदरील रस्त्यावर १० ते १४ हजार २०० वाहतुक आहे. तीन राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा मराठवाडयाचे प्रवेशद्वार अर्थात गेट वे हा लातूर ते टेंभूर्णी राष्ट्रीय महामार्ग आहे. रस्त्यावर दररोज १४ हजार वाहनांची वाहतुक होते. मोठया संख्येने साखर कारखाने आहेत. लातूर जिल्हा सोयाबीन उत्पादनात देशात पहिल्या क्रमाकांवर आहे. शेतक-यांना वाहतुकीला मार्ग उपलब्ध झाल्याने नवी बाजारपेठ उपलब्ध होईल. नीट व आयआयटी प्रवेश परीक्षाचे लातूर मध्ये हब आहे. देशभरातून विद्यार्थी व पालक लातूरला येतात. मुंबई व पुणे मार्गे येणा-या विद्यार्थी व पालकांची सोय होईल. देशाचा दक्षिण भाग जोडला जाणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र.५४८ (सी) टेंभूर्णी-कुसळंब (बार्शी) आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. ६३ (बार्शी येडशी मुरुड- लातूर रस्त्याचे जमिनीचे रुंदी ३० मीटर असून सध्या राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडे आहे. टेंभूर्णी ते विशाखापट्टणम बंदर या रस्त्याने दिर्घकालीन नियोजनामध्ये द्रुतगती मार्ग बनविण्याच्या दृष्टिकोनातून एनएचएआय मानकानुसार ६० मीटर जमिनीच्या रुंदीचा रस्तामध्ये सेवारस्ता अंर्तभूत करून बांधकाम पूर्ण करणे गरजेचे आहे. या करिता रस्त्याच्या दोन्ही बाजूने प्रत्येकी १५ मी. रुंदीचे असे मिळून ३० मी. रुंदीचे भूसंपादन करणे गरजेचे आहे.
सदरचा रस्ता पुणे-लातूर-हैद्राबाद असा कॉरीडॉर होणार असल्याने एनएचएआय मार्फत काम होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी हा रस्ता राष्ट्रीय महामार्गसार्वजनिक बांधकाम विभागाकडून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांचेकडे वर्ग करणे आवश्यक आहे. सदरील महामार्गाचे चौपदरीकरण करण्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लातूर येथे लोकार्पण व भूमिपूजन सोहळयात केली होती. त्या अनुषंगाने दर्जेदार कॉरीडॉरचा विचार करता सदरचा रस्ता एनएचएआयकडे वर्ग करून, पुढील प्रकल्प आराखडयाचे काम सुरु करणे आवश्यक आहे. त्यासाठी गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे कै. पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार प्रतिष्ठाण, मुरूडचे लक्ष्मीकांत बालाजी तवले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.