अनेक आजारांवरील उपचारांत मोहाचा उत्तम परिणाम होतो. पेप्टिक अल्सर, दातांचे आजार, ब्राँकायटिस. आपस्मार, त्वचारोग, ताप, मधुमेह, कृमिजन्य रोग, यकृत, हृदयविकार आदींवर मोह खूपच फायदेशीर आहे. मोहाचा अर्क वेदना कमी करण्यासाठी वापरला जातो. मोहाचा वापर वाढला तर साहजिकच त्याचा गावच्या अर्थव्यवस्थेवर खूपच अनुकूल परिणाम होईल. पूर्ण वाढलेले मोहाचे झाड विविध प्रकारच्या गरजा पूर्ण करते.
महुआ अर्थात मोहाचे झाड भारताच्या जवळजवळ सर्व भागांत आढळते आणि तीन हजार फूट उंचीपर्यंतच्या पर्वतावर हे वाढू शकते. जंगलात मुक्तपणे वाढणारे हे झाड आहे. याची फुले, फळे, बिया, लाकूड असे सर्वकाही उपयुक्त आहे. साधारणपणे या झाडाला २० ते २५ वर्षांत फुले आणि फळे येतात. ही झाडे शेकडो वर्षे टिकतात वनशास्त्रज्ञांनी मोहाच्या अनेक प्रजाती विकसित केल्या असून, त्यांना ५ ते १० वर्षांतच फलधारणा होते. दक्षिण भारतात सुमारे १२ प्रजाती आढळतात. यामध्ये ऋषिकेश, अश्विंकेश, जटायू पुष्प या प्रमुख प्रजाती असून, त्या केवळ ४ ते ५ वर्षांतच फुले आणि फळे देऊ लागतात.
आर्थिक क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे असे आहे की, जगभरात मंदी दार ठोठावत आहे. जागतिक सत्तेचा समतोलही बदलत आहे. यूक्रेन-रशिया युद्ध सुरू आहे. पर्यावरणीय असमतोल आणि हवामान बदलाचा आपल्याला सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत उपजीविकेच्या साधनांमध्येही बदल घडवून आणावे लागतील. तसे केल्यास खाण्यापिण्याच्या सवयींमध्येही बदल होईल. आजकाल ज्यांचा वापर अधिक प्रचलित नाही, असे घटकही विकास आराखड्यात समाविष्ट केले जात आहेत.
सामाजिक स्तरावरही प्रयत्न सुरू आहेत; परंतु ही मोहीम म्हणूनच हाती घेण्याची गरज आहे. सरकारकडून रोजगार हमीची अपेक्षा ठेवता कामा नये, पण सरकारकडून पायाभूत सुविधा आणि शिक्षणाची आशा सोडताही कामा नये. रोजगारासाठी स्वत: केलेले प्रयत्न अधिक अर्थपूर्ण आणि शाश्वत असतात. एहरी भागात स्वयंरोजगाराच्या अनेक संधी आहेत; परंतु ग्रामीण भागात संसाधने मर्यादित असतात. उदाहरणार्थ, शेती, पशुपालन आणि हस्तकला याखेरीज ग्रामीण भागात इतर कोणतेही प्रमुख साधन सापडत नाही. फलोत्पादन हे ग्रामीण भारतासाठी रोजगाराचे एक उत्तम साधन ठरू शकते. बागायतीची चर्चा आंबा, डाळिंब, लिची, केळी, सफरचंद, संत्री, नाशपाती, पेरू आदी काही फळांपुरतीच मर्यादित आहे. फळ नसलेल्या झाडांमध्येही रोजगार आणि उत्पन्नाच्या अफाट संधी आहेत.
या वृक्षांमध्ये बांबूव्यतिरिक्त कुसुम आणि बोर ही झाडे लाखेसाठी उपयुक्त आहेत. या वृक्षांचा वापरच आर्थिक विकासासाठी अधिक प्रमाणात होत आहे; परंतु मोहाचे आर्थिक महत्त्व जेवढे आहे त्या दृष्टीने विचार केल्यास वैज्ञानिक उपयोगाची योजना मर्यादित असल्याचे दिसते आपला देश कोट्यवधी रुपयांचे पामतेल परदेशांतून आयात करतो. मोहाच्या झाडांचा विकास झाल्यास ही आयात मर्यादित होऊ शकते. मोहाचे तेल हे पामतेलापेक्षा अधिक पौष्टिक आहे. योग्य दिशेने प्रयत्न केल्यास १० वर्षांत देश खाद्यतेलाच्या बाबतीत स्वावलंबी होऊ शकतो. तसेच त्यामुळे आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. पूर्णपणे विकसित मोहाचे झाड एका वर्षात किमान ३० हजारांचे उत्पन्न देऊ शकते. मोहाच्या पिकलेल्या फळापासून खाद्यतेल काढले जाते. त्याच वेळी जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी त्याची पेंड महत्त्वाची ठरते. ही पेंड दुधाळ जनावरांना खाण्यासाठीही उपयुक्त असते. मोहाच्या फुलांपासून खाद्यपदार्थ आणि पेये बनविली जातात.
झारखंडसारख्या काही गरीब राज्यांमध्ये मोह, जांभूळ, फणस आदीचा वापर खाण्यासाठी केला जातो. पण वस्तुस्थिती अशी आहे की, अशा झाडांची संख्या कमी होत चालली आहे. मोहाच्या ताज्या फुलांमध्ये आर्द्रतेचे प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत असते, असे वैज्ञानिक संशोधनातून दिसून आले आहे. कोरडे केल्यावर ते ११ ते १९ टक्के राहते. त्याचप्रमाणे पीएचचे प्रमाण ४.६ टक्के, स्टार्चचे प्रमाण ०.९४ टक्के, राखेचे प्रमाण १.५ टक्के, साखरेचे प्रमाण ४७.३५ टक्के, प्रथिनांचे प्रमाण ताज्या फुलांमध्ये ६ ते ७ टक्के इतके असते. कोरड्या फुलांमध्ये प्रथिनांचे प्रमाण सहा टक्के असते. ताज्या फुलांमध्ये स्रिग्धांश १.६ टक्के तर वाळलेल्या फुलांमध्ये ०.०९ टक्के असतो. फायबरचे प्रमाण १०.८ टक्के असते, ताज्या फुलांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण ४५ टक्के तर वाळक्या फुलांमध्ये आठ टक्के असते. ताज्या फुलांमध्ये क जीवनसत्त्वाचे प्रमाण ४० टक्के असते तर वाळक्या फुलात सात टक्के असते. मोहामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण ताज्या फुलांमध्ये २२ टक्के असते तर वाळक्या ६८ टक्के असते. अनेक आजारांवरील उपचारांत मोहाचा उत्तम परिणाम होतो. पेप्टिक अल्सर, दातांचे आजार, ब्राँकायटिस. आपस्मार, त्वचारोग, ताप, मधुमेह, कृमिजन्य रोग, यकृत, हृदयविकार आदींवर मोह खूपच फायदेशीर आहे. मोहाचा अर्क वेदना कमी करण्यासाठी वापरला जातो.
निद्रानाशाच्या आजारात याचे सेवन फायदेशीर ठरते. प्राचीन वैद्य त्याचा उपयोग शरीर बधीर करण्यासाठी (भुलीसाठी) करीत असत. कोंबडीच्या अंड्यातील पिवळा घटक काढून पांढ-या भागात मोहाचा अर्क मिसळून नियमित सेवन केल्यास टीबीच्या आजारात चमत्कृतीपूर्ण परिणाम दिसून येतो. मोहाचा अर्क पिकांमध्ये लागलेली बुरशी काढून टाकण्यासाठीदेखील केला जातो. त्याचा अर्क केवळ आयुर्वेदिक औषधांतच वापरला जातो असे नाही तर मोहाच्या फुलाचा अर्क होमिओपॅथी आणि अॅलोपॅथिक औषधांमध्येही वापरला जातो. याच्या तेलाचा वापर स्वयंपाकासाठी, लावण्यासाठी आणि इंधन म्हणूनही होतो. या तेलामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. मोहापासून लोणचे, लाडू, खीर, चटणी, व्हिनेगर, किसमिस, चिक्की आदी अनेक पदार्थ बनवले जातात. मोहाचा वापर वाढला तर साहजिकच त्याचा गावच्या अर्थव्यवस्थेवर खूपच अनुकूल परिणाम होईल. पूर्ण वाढलेले मोहाचे झाड विविध प्रकारच्या गरजा पूर्ण करते. त्यामुळे त्याला आधुनिक कल्पतरू म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
-पद्मश्री अशोक भगत