26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeलातूरविकासकामांच्या दर्जाबाबत तडजोड नाही

विकासकामांच्या दर्जाबाबत तडजोड नाही

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर शहरातील स्थानिक नागरिकांच्या सूचना लक्षात घेऊन विविध विकास योजना हाती घेण्यात आल्या आहेत. या विकासकामांच्या दर्जात कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी अधिकारी व कंत्राटदारांना स्पष्टपणे बजावले. ज्या-ज्या ठिकाणी विकासाची कामे होत आहेत किंवा होणार आहेत, तेथील नागरिकांनीही जागरुक राहून दर्जेदार कामे करून घ्यावीत, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.

शहरातील संविधान चौक, प्रकाशनगर येथे आमदार अमित देशमुख यांच्या स्थानिक विकास निधीतून लातूर शहर मतदारसंघातील ४ कोटी ८६ लाख ९९ हजार रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमीपूजन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते दि. ३० जुलै रोजी सायंकाळी करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, मनपातील माजी विरोधी पक्षनेते अ‍ॅड. दीपक सुळ, माजी नगरसेवक अशोक गोविंदपूरकर, विजयकुमार साबदे, अहेमदखॉ पठाण, युनूस मोमीन, रविशंकर जाधव, लक्ष्मण कांबळे, अ‍ॅड. समद पटेल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बी. बी. निळकंठ, सिकंदर पटेल, रामभाऊ कोंबडे, सूर्यकांत कातळे, सय्यद इम्रान यांची प्रमुख उपस्थिती होती.

मागची अडीच वर्ष जनतेच्या आणि पक्षनेत्यांच्या आशीर्वादाने राज्यात मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, तेव्हा पारदर्शक, स्वच्छ कारभार केला. कोणी नावे ठेवतील, असे एकही काम केले नाही, असे नमूद करून माजी मंत्री अमित देशमुख म्हणाले की, लातूर शहराचा कायापालट करणा-या अनेक योजना या काळात मंजूर करुन घेतल्या, त्या योजनांची कामे लवकरच सुरू होतील. लातूरला आणखी खूप पुढे घेऊन जायचे आहे, त्यासाठीचे नियोजन तयार आहे, राज्यात सत्ता बदल झाला म्हणून या नियोजनावर कोणताही फरक पडणार नाही. त्यासाठी लागणारा निधी खेचून आणू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
लातूरच्या जनतेने नेहमीच विकासरत्न विलासराव देशमुख, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मंत्री दिलीपराव देशमुख या उत्तुंग नेतृत्वाची निवड केलेली आहे. या नेतृत्वांनी लातूरच्या विकासाची घडी बसवली. परिणामी लातूरचा चौफर विकास झाला. लातूरच्या जनतेने माझीही निवड केली.त्यामुळे नेतृत्वांनी घालून दिलेली लातूरच्या विकासाची घडी विस्कटू देणार नाही. लातूरकरांच्या विश्वासाला कधीही तढा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

लातूरच्या विकासाची भूक मोठी आहे. ती पूर्ण करण्यासाठी काँग्रेसचेच कार्यकर्ते सदैव तत्पर असतात. महिलांना मोफत सीटी बस, वृक्षारोपण, शहराच्या विकासासह विस्तारीत लातूरचा विकास, शहरातील कायदा व सुव्यवस्था चांगली राखणे, याला प्राधान्य दिले गेले. यापूढेही ही कामे प्राधान्याने केली जातील. येत्या काळात शहरातील प्रत्येक प्रभागात विकासाची कामे सुरू होणार आहेत. पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. पावसाळ्यानंतर ख-या अर्थाने विकासाचा पाऊस सुरू होणार आहे.

यावेळी अ‍ॅड. किरण जाधव, विक्रांत गोजमगुंडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यकारी अभियंता बी. बी. निळकंठ यांनी प्रास्ताविक केले. प्रारंभी सूर्यकांत कातळे, आयुब मनियार, रामभाऊ कोंबडे, पप्पू देशमुख, नागसेन कामेगावकर, धोंडीराम यादव, दत्ता सोमवंशी, योजना कामेगावकर, शशिकला यादव, कल्पना मोरे, कमल सूर्यवंशी, सायरा पठाण, रोहीत दयाळ, विकास वाघमारे, महादेव बरुरे, पवन सोलंकर, प्रविण सूर्यवंशी, अ‍ॅड. बाबासाहेब गायकवाड, अ‍ॅड. दयानंद कांबळे, सलमान शेख, मुन्ना शिंदे, बशीर शेख यांनी पाहूण्यांचे स्वागगत केले. सूत्रसंचालन बाळकृष्ण धायगुडे यांनी केले तर दत्ता सोमवंशी यांनी आभार मानले.
चौकट
अडीच वर्षांत शेकडो कोटींची विकासकामे
मागच्या वेळी काठावरचे बहुमत घेवून भाजपाने महानगरपालिकेत सत्ता स्थापन केली आणि अडीच वर्षे लातूरच्या विकासात एक टोपले मुरुमही त्यांना टाकता आलेला नाही. अडीच वर्षांनंतर महानगरपालिकेत सत्ता बदल झाला. काँग्रेसने सत्ता स्थापन केली आणि अडीच वर्षांत शेकडो कोटींची विकास कामे लातूर शहरात करण्यात आली., असेही आमदार अमित देशमुख यांनी सांगितले.

लातूर बिनभिंतीचे सुरक्षित घर
यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले, लातूर शहर हे असे घर आहे, ज्या घरात संरक्षण भिंत नाही पण सुरक्षिततेची भावना प्रत्येकांच्या मनामध्ये आहे. बिनभिंतीचे सुरक्षीत घर, असे लातूर शहर आपण सर्वांनी मिळून निर्माण केले आहे. त्यास तडा जाणार नाही, याची जबाबदारी माझ्यासह आपणा सर्वांची आहे.

शहराचा लौकिक राखणार
लातूर शहरातील सर्वधर्मसमभावाचे वातावरण आणि येथील उत्तम कायदा व्यवस्था यामुळे या शहराचा लौकिक आहे तो कायम राखला जाईल, लातूर शहर शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित होत आहे त्यासाठी आवश्यक असणा-या सर्व सोयी सुविधा पुरविण्यात येतील, असे आश्वासन आमदार अमित देशमुख यांनी यावेळी दिले.

निवडणुकीत कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहा
येत्या काही दिवसांत लातूर शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे. त्यामुळे नागरिकांनी जो कार्यकर्ता आपल्या कामाला आला, अशाच काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या