जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील तिरु नदीवर सुलाळी ते डोंगरगाव या गावांना जोडण्यासाठी पुलाची आवश्यकता होती. गत अनेक वर्षापासून या दोन गावांना जोडणारा पुल व्हावा अशी मागणी होत होती. याबाबत दैनिक एकमतनेही अनेक वेळा बातम्या प्रसीद्ध केल्या होत्या. यांची दखल घेत माजी गृहराज्यमंत्री आमदार संजय बनसोडे यांनी, सरकारकडे डोंगरगाव ते सुलाळी दरम्यान तिरु नदीवर पूल उभारण्यास मंजुरी द्यावी अशी मागणी लावून धरली होती. अखेर या मागणीला यश आले असून या पुलाच्या बांधकामासाठी शासनाकडून १७ कोटी ६० लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती सुलाळीचे सरपंच शिरिष चव्हाण यांनी दिली .
जळकोट तालुक्यातील डोंगरगाव ते सुल्लाळी या गावाला जाण्यासाठी दोन गावाच्या मधून मोठी तिरू नदी वाहते ,जिल्ह्यात मांजरा नदी नंतर सर्वात मोठी नदी म्हणून तिरू नदीला ओळखण्यात येते, यामुळे तिरू नदीचे पात्र रुंद आहे तसेच पावसाळ्यात या दोन्ही गावाचा संपर्क तुटलेलाच असतो , पूल नसल्यामुळे या दोन्ही गावा दरम्यान दुचाकीदेखील जाणे अशक्य आहे. पूर्वी सुलाळी या गावाचा तालुका उदगीर होता, यामुळे येथील ग्रामस्थांना उदगीर जवळ पडायचे परंतु यानंतर सन १९९९ साली जळकोट तालुक्यातील निर्मिती झाली व हे गाव जळकोट तालुक्यामध्ये आले परंतु या गावाला जळकोट तालुक्याच्या ठिकाणी यायचे झाल्यास घोणशी मार्गे येण्याशिवाय पर्याय नव्हता, घोणसी मार्गे येणे सुलाळी येथील गावक-यांना खूप लांब पडत आहे. तसेच या गावाहून डोंगरगाव हे अंतर केवळ दोन किलोमीटर परंतु डोंगरगावला यायचे म्हटले तर २५ किलोमीटर दूर अंतर कापून डोंगरगावला यावे लागायचे .
सुल्लाळी येथील सरपंच शिरिष चव्हाण यांनीही या नदीवर पूल व्हावा अशी मागणी अनेक वेळा केली होती . या नदीवर पूल व्हावा तसेच सुलाळी व इतर गावातील नागरिकांची अडचण दूर व्हावी यासाठी माजी गृहराज्यमंत्री संजय बनसोडे यांनी यासाठी पाठपुरावा केला. यामुळे सुल्लाळी व डोंगरगाव दरम्यान तिरु नदीवर पूल मंजूर झाला आहे.यामुळे गावक-यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
जळकोट तालुक्यातील सुलाळी ते डोंगरगाव या दोन गावांना जोडणा-या तिरू नदीवर पूल मंजूर केल्याबद्दल तसेच या पुलासाठी सतरा कोटी साठ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल माजी गृहराज्यमंत्री आमदार संजय बनसोडे यांचे सरपंच शिरीष चव्हाण, डोंगरगावचे सरपंच सातापुरे, अंकुश करडे, बाबूराव पाटील यांच्यासह समस्त डोंगरगाव व सुलाळी ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.