लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील औसा रोडवर आदर्श कॉलनी जवळ गुरुवारी पहाटे काही अज्ञात व्यक्तींनी एका मोठ्या झाडाच्या सर्व फांद्या छाटून झाड तोडण्याचा प्रयत्न केला. ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यांनी महानगरपालिका आयुक्त, उपायुक्त संबंधित अधिकारी यांना व्हॉट्सअपद्वारे माहिती देऊन त्यांच्याद्वारे कारवाई करावी, अशी मागणी केली.
त्यानंतर शुक्रवारी ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यांनी तोडलेल्या झाडासमोर तोंडाला काळ्या मुखपट्ट्या बांधून झाड तोडण्याचा निषेध व्यक्त केला. शहरामध्ये ठिकठिकाणी झाड तोडणे, झाडांच्या खाली केमिकल टाकून झाडे जाळणे, झाडांच्या फांद्या मोडणं, झाडांच्या खाली कचरा जाळणे अशा विध्वंसक बाबी वारंवार होत आहेत, टीमचे सदस्य डॉ. भास्कर बोरगावकर यांनी अशा विध्वंसक कारवाई करणा-या लोकांवरती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. झाडाखाली सावलीमध्ये गाडी लावू दिली नाही म्हणून दोन-तीन अज्ञात व्यक्तींनी रागाच्या भरात झाडांच्या सर्व फांद्या तोडल्या, अशी चर्चा आजूबाजूला सुरु होती. झाड तोडण्याच्या अगोदर, फांद्या मोडण्याच्या अगोदर शेजारील सीसीटीव्ही कॅमेरा दिशा बदलण्यात आली होती, असेही कळाले. या घटनेचा निषेध करण्यासाठी ग्रीन लातूर वृक्ष टीमचे सर्व सदस्य उपस्थित होते.