लातूर : प्रतिनिधी
गेल्या वर्षभरापासून लातूर शहर महानगरपालिकेत प्रशासक राज आहे. ना महापौर ना नगरसेवक त्यामुळे महानगरपालिकेचा कारभार मोकळाढाकळा सुरु आहे. या कारभारामुळे नागरीकांचे प्रश्न सुटण्याऐवजी आणखीन वाढत आहेत. त्यातील महत्वाचा प्रश्न म्हणजे घनकच-याचे व्यवस्थापन. आजघडीला महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचे तीनतेरा झाल्याची स्थिती पहावयास मिळत आहे. घनकचरा व्यवस्थापनाची यंत्रणा ढासळल्याने शहरात सर्वत्र कचराच कचरा दिसून येत आहे.
लातूर शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. नगरं आणि वसत्या वाढत आहेत. लातूर शहराची लोकसंख्या साडेतीन ते चार लाखांपेक्षा अधिक आहे. शैक्षणिक आणि व्यापारी शहर असल्यामुळे लाखो लोक लातूर शहरात दररोज ये-जा करतात. फ्लोटींग पाप्युलेशनही मोठ्या प्रमाणात आहे. लातूर शहरात उद्योग, व्यवसाय, मेस, हॉटेलस्, लॉजिंग, भेळ, पाणीपुरी, वडापाव, इडली-सांबर, दोसा, उत्तपा, चहा, नाष्टा, फळांची विक्री करणा-या हातगाड्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय लातूर शहरात उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा, सुविधा पुरविणारे दवाखानेही मोठ्या संख्येत आहेत. या सर्व आस्थापनांतून दररोज किमान २०० टन कचरा निघतो. यात ओला, सुका आणि घातक कच-याचा समावेश आहे.
शहरात निर्माण होणा-या कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी लातूर शहर महानगरपालिकेने शहरातीलच एका सेवाभावी संस्थेला घनकचरा व्यवस्थापनाचे काम दिलेले आहे. ही संस्था त्याची स्वत:ची यंत्रणा उभी करुन घनकचरा व्यवस्थापनाचे काम करीत आहे. परंतू, या संस्थेकडून करारानूसार काम होताना दिसत नाही. परिणामी शहरातील कच-याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. नागरीक आपापल्या घरी कच-याचे संकलन करीत आहेत. परंतू, घंटागाडी नियमित किंवा ठरलेल्या रोटेशननेही घंटागाडी येत नसल्याने नागरीक नाईलाज म्हणून घरात साठवलेला कचरा रस्त्यावर टाकत आहेत. त्यामुळे शहरात सर्वत्र कचराच कचरा दिसून येत आ.े घंटागाडीचालक मनमानी करीत असल्यामुळे नागरीक त्रस्त आहेत. यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने घनकचरा व्यवस्थापन कोलमडल्याचे दिसून येत आहे.
घनकचरा व्यवस्थापनाच्या नियमानूसार प्रत्येक नागरीकांनी आपापल्या घरी ओला, सुका कचरा वेगवेगळा संकलीत करणे अपेक्षीत आहे आणि ते नागरीकांकडून केलेही जात आहे. परंतू, एखाद्या घरात किती दिवस कचरा संकलीत करायचा?, यालाही मर्यादा आहेत. घंटागाडी घरोघरी जाऊन संकलीत केलेला कचरा घेत नसेल तर घरात संकलीत केलेल्या कच-याची दुर्गंधी किती दिवस सहन करायची, हाही विषय आहे. घंटागाडी येतच नसल्यामुळे नागरीक घरातील कचरा रस्त्यावर टाकतात. त्यामुळे सर्वत्र कचराच कचरा दिसून येत आहे.
घंटागाडी नियमित येत असले तर रस्त्यावर कचरा टाकण्याचा प्रश्नच येत नाही. परंतू, घनकचरा व्यवस्थापनाच्या कामात कुचराई होत असल्याकारणाने शहरात कच-याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
कचरा टाकण्यावरुन झाले भांडण
घंटागाडीच येत नसल्यामुळे दोन नागरीकांनी घरात संकलीत केलेला कचरा चक्क एका माजी नगरसेवकाच्या घरासमोर नेऊन टाकला. माजी नगरसेवकाने याचा जाब विचारला. तेव्हा कचरा टाकणा-यांनी तूम्हाला आम्ही मतदान केले आहे. तुम्ही नगरसेवक आहात. घंटागाडी येत नाही. घरात किती दिवस कचरा साठवून ठेवणार. कच-याची दुर्गंधी सुटली आहे. तुम्ही घंटागाडी नियमित यावी, अशी व्यवस्था करीत नाहीत. त्यामुळे घरात कचरा मोठ्या प्रमाणात साठला. तो कचरा तुमच्या घरासमोर टाकत आहे. निदान तुमच्या घरासमोरील कचरा तरी घंटागाडी उचलून नेईल, असे सूनावले. यावर माजी नगरसेवक काहीच बोलले नाही. परंतू, त्यांच्या शेजा-यांनी कचरा टाकणा-यांसोबत हुज्जत घातली, बाचाबाची झाली, भांडणही झाले. अशा घटना आता दररोज घडत आहेत. त्याला जबाबदार कोण?, हा खरा प्रश्न आहे.