लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात आज दि. ३०, ३१ मे व १ जून रोजी तूरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह पाऊस होण्याचा व वा-याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर असण्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने दिले आहेत. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन अपर जिल्हा दंडाधिकारी यांनी केले आहे.
उपरोक्त तीन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजाच्या कडकडाटासह पाउस होण्याचे व या ठिकाणी वा-याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर असण्याचे संकेत आहेत. त्या करीता नैसर्गिक आपत्तीचे नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवून दर तासानी पडणा-या पावसाबाबत तसेच काही हानी झाल्यास त्याबाबत संदेश या जिल्हा कार्यालयास द्यावा. सदर कालावधीत विजा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व शेतकरी, नागरिक यांनी खबरदारी घ्यावी. विशेषत: शेतक-यांनी विजांचा कडकडाट होत असताना शेतीचे कामे करु नये. व आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करुन स्वत: सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्यावा.
झाडाखाली, विद्युत खांब, तारा याजवळ थांबू नये. धातूचे वस्तू सोबत बाळगू नये. खुल्या मैदानात असाल तर उंच ठिकाणी न थांबता खोलगट जागेत एखादी लाकडी वस्तू पायाखाली ठेवून खाली बसावे. जलसाठ्याजवळ जाऊ नये, आपल्या मुलांना जलसाठ्यावर पोहण्यासाठी पाठवू नये, शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करावे, पुलावरुन, नाल्यावरुन पाणी वाहत असताना कोणीही स्वत: किंवा वाहनासह पूल, नाला ओलांडण्याचा प्रयत्न करु नये. पूर प्रवण क्षेत्रात कोणीही जाऊ नये. अशा सुचना निर्गमित करुन आपण आपल्या तालुक्यातील नदी काठच्या गावाना सावधगीरीची सूचना देवून योग्य ती उपाययोजना करावी व तसा अनुपालन अहवाल या कार्यालयास सादर करावा. सदरच्या कालावधीत कोणीही आपले मुख्यालय सोडू नये.
लातूर जिल्ह्यात दि. २० मे रोजी बिगर मोसमी पाऊस पडला होता. या दिवशी संपुर्ण दिवसभर उन्हाचा कहर होता. सायंकाळी अचानक आकाशात ढगांची गर्दी झाली आणि वादळी वा-यासह विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली होती. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी वादळी पाऊस पडला होता. पावसापेक्षा अधिक वादळ व विजांचा कडकडाट होता. काही ठिकाणी विजाही पडल्या. या विध्वंसक पावसाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळुन पडली होती. विजां पडल्याने पशुधन दगावले होते. निसर्गाने काही क्षणातच रौद्ररुप धारण केले होते. आता दि. ३०, ३१ मे व १ जून रोजी विजांच्या कडकडाटांसह वादळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याामुळे शेतक-यांनी, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन अपर जिल्हा दंडाधिकारी यांनी केले आहे.