लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ६१ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेला यावर्षीही लातूर- नांदेड केंद्रावर कलाकार आणि नाट्यरसीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत सांघीकसह लातूरला ६ पारितोषीके मिळाली आहेत. परभणी येथील दानव नाटक प्रथम तर लातूर येथील अबीर गुलाल या नाटकास सांघीक व्दितीय पारितोषीक मिळाले असून या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.
लातूर ही शिक्षणाची आणि कलेची भुमी आहे. येथे नाट्यरसीकांची संख्या लक्षणीय असल्यामुळे येथील सांस्कृतिक गरज पाहता भविष्यात नाटय चळवळीला गती मिळावी यासाठी महाविकास आघाडी सरकार असतांना मागच्या वर्षी तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सांस्कृतिक कार्य संचालनातर्फे आयोजित करण्यात येणा-या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे लातूर येथे केंद्र मंजूर केले होते. लातूरला हौशी मराठी नाट्य स्पर्धा केंद्र म्हणून निवड केल्यामुळे येथील कलावंतांची सोय झाली. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक नाटके या केंद्रावर सादर झाली. सादर झालेल्या या नाटकांना भरघोस प्रतिसाद मिळाला.
लातूर- नांदेड केंद्रावर झालेल्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा सन २०२२-२३ या स्पर्धेत परभणी येथील गोपाळ फाऊंडेशनकडून सादर केलेल्या दानव नाटकास प्रथम पारितोषीक मिळाले तर लातूर येथील शकुतलादेवी सामाजिक सेवाभावी संस्थेच्या अबीर गुलाल नाटकास व्दितीय पारितोषीक मिळाले असून या दोन्ही नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. क्रांती हुतात्मा संस्था परभणीच्या सृजन्मय सभा नाटकास तृतीय पारितोषिक मिळाले आहे. या झालेल्या राज्य नाटय प्राथमिक फेरीतील स्पर्धेत लातूर येथील नाटयसंस्थानी मोठया उत्साहाने सहभाग घेतला. अबीर गुलाल या नाटकासाठी उत्कृष्ट दिग्दर्शनाचे व्दितीय पारितोषीक प्रशांत जानराव यांना मिळाले तर अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाणारे अभिनयाचे रौप्य पदक नाटक-अबीर गुलालसाठी लातूरचेच कानिफनाथ सुरवसे यांना मिळाले आहे. नेपथ्याचे व्दितीय पारितोषीक लक्ष्मण वाघमारे यांना (नाटक- मिशन-२९) या नाटकासाठी मिळाले आहे. स्रेहा शिंदे आणि वैष्णवी वाघ या गुणी स्त्री कलावंतांना अभिनयाचे प्रमाणपत्र किरवंत आणि मिशन-२९ या नाटकासाठी मिळाले. लातूर केंद्रावर उत्कृष्ट संयोजनाचे काम ज्येष्ठ रंगकर्मी बाळकृष्ण धायगुडे यांनी समन्वयक म्हणून केले.