चाकूर : प्रतिनिधी
राज्य पर्यटन विकास महामंडळाची मान्यता असलेले येथील ‘साईनंदनवनम’ येथे कृषि व ग्रामीण संस्कृतीचा संगम असलेल्या वृंदावन कृषि पर्यटन येथील हुरडा पार्टीला पर्यटकांची मोठी पसंती मिळत असून चमचमीत चटण्याबरोबर खास हुरडा खाण्यासाठी साईनंदनवनमकडे पर्यटकांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे ग्रामीण कृषि पर्यटनाला महत्त्व येत आहे.
राज्यात साधारणत: डिसेंबर महिन्यापासून हुरडा पार्टीचे खवय्यांना वेध लागतात. हुरडा पार्टीच्या निमित्ताने एक दिवसीय सहल व मनोरंजनाचा आनंद घेण्याबरोबरच गरम गरम हुरड्याचा चमचमीत चटण्याबरोबर आश्वाद घेतला जातो. शेतात जाऊन मस्त हुरडा पार्टी करण्याची मजाच काही वेगळी असते. त्यानिमित्त रानात फिरणे होते व ग्रामीण संस्कृतीची अनुभूती घेता येते. त्यामुळे निसर्गरम्य परीसरात असलेल्या महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची मान्यता प्राप्त साईनंदनवनम चाकूर (जि.लातूर) येथील वृंदावन कृषि पर्यटन येथील हुरडा पार्टीला मराठवाड्यासह शेजारील कर्नाटक राज्यातील पर्यटकांची मोठी पसंती मिळत आहे.
वृंदावन हुरडा पार्टीमध्ये दिवसभराचा पॅकेज उपलब्ध असते. त्यात सकाळी आगमन झाले की उसाचा ताजा रस दिला जातो. त्यांनंतर नाश्त्याला पोहा, चिवडा, पेरू, व इतर फ्रुट दिले जातात. त्यानंतर हुरडा ज्वारीचे कणीस भाजून त्यासोबत विविध चटण्या, मठ्ठा, भाजलेले वांगे, कांदा आदी पदार्थ दिले जातात. दुपारी जेवणामध्ये ग्रामीण पद्धतीने चुलीवर केलेल्या जेवणामध्ये पिटले, वरण, वांग्याची काळ्या मसाल्याची भाजी, गव्हाची खीर, कडक बाजरी व ज्वारीची भाकरी पापड, भात, दही, ठेचा असा मेनू दिला जातो. दिवसभर आंबा व चिक्कूच्या बागेत लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी व इतर बरेच खेळणी आहेत. संध्याकाळी चहासोबत कांदा भजी देऊन एकदिवसीय हुरडा पार्टीचा समारोप होतो. वृन्दावंन कृषि पर्यटन येथे वॉटर पार्क, अॅम्युजमेंट पार्क,शिवालयासह तिरूपती बालाजी व इतर देवी देवतांचे दर्शन ही होते. त्यामुळे वृन्दावंन कृषि पर्यटनाला पर्यटकांची मोठी पसंती मिळत असून ग्रामीण संस्कृतीसह कृषि पर्यटन बहरत आहे.या ठिकाणी पर्यटकांना मनमोकळेपणाने आनंद घेता येतो कारण येथे पर्यटकांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जाते.