जळकोट : पंचायत समिती सभागृह जळकोट येथे तालुका कृषी अधिकारी जळकोट व पंचायत समिती कृषी विभाग जळकोट यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिन कार्यक्रम झाला. या कार्यक्रमांमध्ये जळकोट तालुक्यातील उत्कृष्ट शेती तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणा-या १२ शेतक-यांचा कृषी विभागाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळकोट तालुक्यातील प्रगतशील शेतकरी गणपत धुळशेटे हे होत. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार हे उपस्थित होते. प्रमुख पाहूणे म्हणून तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, मंडळ कृषी अधिकारी अनिल गीते, जिल्हा शेतकरी सल्ला समिती सदस्य मधुकर पवार, कृषी अधिकारी पंचायत समिती सुडे, विस्तार अधिकारी कृषी दापके, व्यंकटराव धुळे, कृषी पर्यवेक्षक नानासाहेब धुपे, कृषी पर्यवेक्षक ज्ञानोबा हंगरगे, कृषी विभागातील सर्व कृषि सहाय्यक अधिकारी, कर्मचारी तसेच जळकोट तालुक्यातील विविध बाबींमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे प्रगतशील शेतकरी, कृषी मित्र, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अभिलाष क्षीरसागर व पंचायत समितीमधील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी दापके यांनी स्व.वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित कृषी दिनानिमित्त कार्यक्रम त्यांचे शेतीमधील योगदान हरितक्रांती कशाप्रकारे अंमलात आणली व महाराष्ट्राच्या हरितक्रांती झाली त्यामधील त्यांचे योगदान व महत्त्व सविस्तरपणे उपस्थित शेतक-यांंना सांगितले. यावेळी कृषी विभागाच्या वतीने तालुक्यातील नाविन्यपूर्ण व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणा-या उत्कृष्ट अशा १२ शेतक-यांंचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी काही प्रगतशील महिला शेतकरी सौ. सुचिता मरेवाड चेरा यांनी सेंद्रिय शेती व सेंद्रिय शेतीमध्ये लागणा-या जैविक पदार्थांची निर्मिती कशी करावी व सेंद्रीय शेती विषय महत्त्व याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
घोणसी येथील प्रगतशील युवा शेतकरी कालिदास डावळे यांनी फळबाग लागवड सागवान पीक व जैविक जिवाणू चा शेतीमधील वापर व त्यापासून विविध असे जैविक औषधे व कीटकनाशके बनवणे याविषयी शेतक-यांना मार्गदर्शन केले. गटविकास अधिकारी मेडेवार यांनीही शेतक-यांना कृषी दिनानिमित्त शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले.तालुका कृषी अधिकारी जळकोट आकाश पवार यांनी कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये कृषी विभागाच्या विविध योजना व त्यामधील सहभाग याविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रगतशील शेतकरी गणपतराव धूळशेटे यांनी केले. कार्यक्रमाला तालुक्यातील विविध गावातील शेतकरी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अभिलाष क्षीरसागर कृषी विस्तार अधिकारी दापके व धुळे यांनी प्रयत्न केले.