लातूर : ट्वेन्टीवन शुगर्स लि. युनीट -१ कारखान्याकडून चालू गळीत हंगाम २०२१-२०२२ मध्ये गळीत झालेल्या ऊसाला एफआरपीप्रमाणे अंतिम ऊसदर २४२१ रुपये झाला असून कारखान्याने ऊसदरापोटी या अगोदर २२०० रुपये अदा केले आहेत तर अंतीम हप्ता २२१ रुपयांप्रमाणे जाहीर केला आहे. याप्रमाणे गळीत हंगामात शेतक-यांंना ऊसदरापोटी २९५ कोटी रूपये देण्यात आले आहेत.
लोकनेते विलासराव देशमुख व आईसाहेब वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या आर्शीवादातून आणि माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वात उभा राहिलेल्या मळवटी येथील ट्वेन्टीवन शुगर्स लि. युनीट १ चा पहिला गळीत हंगाम विक्रमी झाला असून या हंगामात कारखान्याने केलेल्या विक्रमी ऊस गळीताचे साखर उद्योगात मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले आहे. गळीत हंगामात ऊसाचे क्षेत्र वाढल्यामुळे शेतक-यांच्या संपूर्ण उसाचे गाळप होईपर्यंत विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा परिवारातील सर्व कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू ठेवावा या परीवाराच्या धोरणाप्रमाणे शेतक-याच्या अतिरिक्त उसाचे संपूर्ण गाळप गाळप होईपर्यत या कारखान्याचा गळीत हंगाम सुरू ठेवण्यात आला होता.
या कारखान्याने पहिल्याच गळीत हंगाम २०२१-२०२२ मध्ये टवेन्टीवन शुगर्स ली. युनीट १ कडून १२ लाख १८ हजार मे. टन ऊसाचे गाळप करुन १३ लाख ५२ हजारकिं्वटल साखर पोत्याचे उत्पादन केले आहे. हा हंगाम २२४ दिवस चालला. कारखाना कार्यक्षेत्रात अतिरीक्त ऊस होता या ऊसाचे संपूर्ण गाळप करण्यात आले आहे. गळीत हंगामात केलेले विक्रमी गाळप मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात सर्वांधिक करण्याचा मान पहिल्याच हंगामात पटकावला आहे.
या गळीत हंगामात गाळप केलेल्या ऊसास कारखान्याकडून या अगोदर २२०० रुपये प्रमाणे २६८ कोटी १० लाख रुपये अदा करण्यात आले असून आत हप्ता २२१ रुपये प्रमाणे २६ कोटी ९४ लाख रुपये देण्यात येत असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख व व्हाईस चेअरमन समीर सलगर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
शेतक-यांना अधिकाअधिक लाभ मिळवून देण्यासाठी माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख तसेच विलास कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी घेतलेल्या भूमिके बद्दलही व्हाईस चेअरमन विजय देशमुख, व्हाईस चेअरमन समीर सलगर, संचालक मंडळ, आणि ट्वेंटीवन शुगर्स टीम तसेच शेतक-यांच्या वतीने त्यांचे आभार मानले आहेत. या निर्णयामुळे सभासद व ऊस उत्पादक शेतक-यांंनी आनंद व्यक्त केला आहे.