निलंगा : तालुक्यातील मांजरा व तेरणा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाल्याने महाराष्ट्र महसूल विभाग , पोलीस प्रशासन व कर्नाटक पोलिस प्रशासनाने संयुक्त कार्यवाही करीत दि २९ मे शनिवार रोजी रात्री ११.२५ वाजता अवैधरित्या वाळू उपसा करणा-या दोन बोटी जिलेटिनद्वारे स्फोट करून उद्ध्वस्त केल्या. प्रशासनाच्या दबंंग कारवाईमुळे वाळू माफियांंना दणका बसला आहे. यामुळे अवैद्य वाळू उपसा करणा-या व्यवसायिकांची धाबे दणाणले आहेत .
निलंगा तालुक्यातून मांजरा व तेरणा नद्या वाहतात. या दोन नद्यांचा संगम महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर औराद शहाजानी व वांजरखेडा येथे होतो. मांजरा व तेरणा पात्रातील अवैधरित्या वाळू उपसा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या तक्रारी अनेक वेळा प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत. शिवाय अवैध वाळू वाहतूक करणारी अवजड वाहने रस्त्यावरून जात असल्याने रस्त्याची वाट लागत आहे. याबाबतच्याही तक्रारी प्रशासनाकडे नागरिकांसह शेतक-यांनी केल्या आहेत. तरीही प्रशासन याबाबत कसल्याही प्रकारची कार्यवाही करण्याची तसदी घेत नसल्याने वाळूमाफियांनी डोके वर काढले होते. शिवाय नदीपात्रातून वाळू उपसा करण्याकरिता उत्खननाची परवानगी न घेता वाळूमाफियांनी तेरणा व मांजरा नदीपात्रात हायदोस घातला आहे.
विशेष म्हणजे मांजरा नदी पात्रात औराद शहाजानी व वांजरखेडा तालुका भालकी सीमेवर वाळूची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. याकरिता महाराष्ट्राचे प्रशासन कार्यवाही करण्यासाठी आल्यानंतर त्या वाळू उपसा करणा-या बोटी कर्नाटकात हद्दीत हलवल्यिा जात होत्या . तर कर्नाटक प्रशासन कार्यवाहीसाठी तत्पर झाल्यानंतर बोटी महाराष्ट्रात हद्दीत आणल्या जात होत्या. अशाप्रकारे महाराष्ट्र व कर्नाटक महसूल व पोलिस प्रशासनाला चकवा देत वाळूमाफिया मोठ्या प्रमाणात मांजरा पत्रात अवैधरित्या वाळूचा गोरख धंदा सुरू केला होता. यामुळे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील पोलीस व महसूल प्रशासनाच्या हाती काहीही लागत नसल्याने वाळू माफियाने डोके वर काढले होते. यामुळे दि २८ मे रोजी शेतक-यांंनी अवैधरित्या वाळू वहातुक करणारे दोन हायवा पकडून ठिय्या मांडत पंचनामा करून पोलीस ठाणेत जमा करण्यास भाग पाडले.
तेंव्हा सायंकाळी निलंग्याचे तहसीलदार गणेश जाधव यांच्यासह त्यांचे सहकारी व औराद पोलिस ठाण्याचे सपोनि संदीप कामत यांच्यासह त्यांचे सहकारी महाराष्ट्राच्या हद्दीत व मेहकर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कारंजे व त्यांचे सहकारी कर्नाटक राज्याच्या बाजूस थांबून अवैधरित्यावाळू उपसा करणा-या दोन बोटी ताब्यात घेतल्या. सदर बोटी रात्री ११.२५ वाजता मांजरा नदी पात्रात महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर जिलेटिनद्वारे स्फोट करून उद्ध्वस्त करण्यात आल्या असल्याचे तहसीलदार गणेश जाधव यांनी सांगितले. महसूल व पोलिस प्रशासनाच्या या दबंग कार्यवाहीमुळे अवैधरित्या वाळू उपसा करणा-या वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. या संयुक्त कार्यवाहीत निलंगा तहसीलदार गणेश जाधव, औरादचे तलाठी बालाजी भोसले, तगरखेडा तलाठी विशाल केंचे, विजय दसरे, श्याम भोसले, औराद ठाण्याचे सपोनि संदीप कामत, पोलीस नाईक गोपाळ बरडे, पो का.विश्वनाथ डोंगरे, पोलीस नाईक, श्रीनिवास चिटबोने, कर्नाटकातील मेहकर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कारंजे व त्यांचे सहकारी यांचा समावेश होता. या महसूल व पोलिस प्रशासनाच्या दबंग कारवाईमुळे त्यांचे शेतकरी व नागरिकातून अभिनंदन केले जात आहे.