लातूर : सजग पालकत्व व मुलांवरील संस्कार ही आजच्या काळाची ज्वलंत गरज व चिंतनीय बाब आहे. आपल्या मुलांनी केवळ इंजिनिअर-डॉक्टर बनावे, असा अट्टाहास धरू नका. पाल्यांवर पालकांनी अपेक्षा लादू नये. त्यांच्यावर मनापासून प्रेम करा, मुलांना समजून घ्या, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण सचिव नंदकुमार यांनी पालकांना केले.
लातुरातील ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्पाच्या वतीने लॉकडाऊन काळात पालकांसाठी झुम मिटींगद्वारे ‘२१ व्या शतकातील बदलत्या शिक्षणात पालकांची भूमिका’ या विषयावर तीनदिवसीय पालकांची शाळा या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचा समारोप रविवारी झाला. यावेळी ते बोलत होते. या कार्यशाळेत मास्टर ट्रेनर निलेश घुगे, अक्षय नंदकुमार, शाम मकरंमपुरे यांनी पालकांशी संवाद साधत त्यांना सजग पालकत्वाचे धडे दिले. पुढे बोलताना माजी शिक्षण सचिव नंदकुमार म्हणाले की, सगळ््या मुलांनी आपल्या पालकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या ठरवल्या तर मग इतर क्षेत्राचे काय?. त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार घडू द्या, फुलू द्या, करीअर करू द्या. त्यांना हवे ते क्षेत्र निवडण्याची संधी द्या, असे आवाहन त्यांनी केले.
मास्टर ट्रेनर निलेश घुगे म्हणाले की, आपला मुलगा यशस्वी व्हावा असे जर प्रत्येक पालकांना वाटत असेल तर, बालपणापासूनच सुरूवात करायला हवी. मुलांच्या जिज्ञासुवृत्तीचा सन्मान करायला पालकांना शिकले पाहिजे. पालकांनी किती सहज रहावे, हा पण एक चिंतनीय भाग आहे. मुलांनी माझ्यासारखं व्हावं हा अट्टाहास पालकांनी धरू नये. मुलं अनुभवातून शिकत नसतात. चिंतन आणि मननातून ते शिकत असतात.
एखाद्या गोष्टीचे चिंतन करणे, मनन करणे आणि यातून काय समजले ते लिहून काढणे म्हणजे अभ्यास होय. मुलांशी सतत बोलत रहाणे, हे देखील तितकेच महत्वाचे आहे. संवाद हा पालकत्वाचा बेस्ट मार्ग आहे.
मुलांच्या अडचणी समजून घ्या. त्यांच्याशी मोकळेपणाने बोला. त्यांच्या आवडी-निवडी जाणा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रकल्प प्रमुख सतीश नरहरे यांनी प्रास्ताविक केले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी संचालिका सविता नरहरे, अशोक गुरदळे यांच्यासह शिक्षक व शिक्षिकांनी प्रयत्न केले. या तीनदिवसीय कार्यशाळेत जवळपास ७०० पालकांनी सहभाग नोंदवला. सुजाता कुलकर्णी, गोविंद लाडे, डॉ. पवन लड्डा, सुखदा कुलकर्णी, माधुरी दंडिमे, नंदिनी कुलकर्णी, सुधीर नलवाड, वर्षा देवशटवार आदी पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
Read More मांजरांमध्ये कोरोनाचा विषाणू सापडल्याची पहिली केस ब्रिटनमध्ये सापडली