लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील चाकूर, देवणी, शिरुर अनंतपाळ व जळकोट नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये महाविकास आघाडीला निर्वीवाद विजय मिळाला असून काँग्रेस पक्षाला सर्वाधिक २३ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १४ शिवसेनेला ६ जागेवर विजय मिळाला आहे. या निवडणूकीत मतदारांनी महाविकास आघाडीला जिल्ह्यात कौल दिला या बददल राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सर्व मतदारांचे आभार मानून महाविकास आघाडीच्या सर्व विजयी उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.
नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूकीला सामोरे जाताना लातूर जिल्ह्यात महाविकास आघाडीची माध्यमातून लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी पूढाकार घेऊन निवडणूकीला सामोरे गेले. या निवडणुकीत चाकूर, देवणी, शिरुर अनंतपाळ व जळकोट येथे महाविकास आघाडी उमेदवारांसाठी प्रचार सभा घेण्यात आल्या. या सभेच्या माध्यमातून विकासाला गती देण्यासाठी, मुलभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी संधी देण्याचे आवाहन मतदारांना नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले होते. तसेच महाविकास आघाडीच्या माध्यमातून केलेली विकासकामे मतदारांसमोर ठेवण्यात आले. मतदारांनी जिल्ह्यातील नगर पंचायत निवडणूकीत विकासासाठी महाविकास आघाडीला कौल देऊन मतदान केले आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सर्वांधिक २३ जागा मिळाल्या असून देवणी नगर पंचायत मध्ये एकहाती सत्ता आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला १४ जागा मिळाल्या असून शिवसेना ६ जागेवर विजयी झाली आहे. या पूढील काळात स्थानिक पातळीवर विकासाची साखळी मजबूत करुन मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पदाधिका-यांनी
पूढाकार घ्यावा, महाविकास आघाडी सरकारकडून पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाहीही, पालकमंत्री श्री देशमुख यांनी या निमित्ताने दिली आहे.
या नगर पंचायत निवडणुक प्रचारात अहोरात्र परिश्रम केलेल्या महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व विजयी उमेदवरांचे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी अभिनंदन केले असून सर्व मतदारांचे आभार मानले आहेत.
हा विजय म्हणजे काँग्रेसच्या कार्यावर आणि नेतृत्वावर मतदारांनी दाखवलेला विश्वास
लातूर जिल्ह्यातील ४ नगरपंचायतीच्या निवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून, यात तब्बल २३ जागा मिळवत काँग्रेस पक्ष हा या निवडणुकीत जिल्ह्यात क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. हा विजय म्हणजे काँग्रेसच्या विचारधारेवर, जनहिताच्या कार्यावर आणि नेतृत्वावर मतदारांनी दाखवलेला विश्वास आहे. पूर्वी भाजपच्या ताब्यात असलेल्या जळकोट, देवणी, चाकूर, शिरूर अनंतपाळ या चारही नगरपंचायतीत कॉंग्रेस पक्षाला आणि महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला व महाविकास आघाडीला दणदणीत विजय मिळाल्याबद्दल मतदारांचे मी मन:पूर्वक आभार मानतो. निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन करतो. निवडणुकीत आम्ही दिलेला विकासाचा शब्द आपल्याला खरा करुन दाखवू.
– धिरज विलासराव देशमुख, आमदार, लातूर ग्रामीण