19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeलातूरग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिका-याचे पद रिक्त

ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिका-याचे पद रिक्त

एकमत ऑनलाईन

रेणापूर : सिध्दार्थ चव्हाण
रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या एक ते दिड महिन्यापासुन वैद्यकीय अधिका-याचे पद रिक्त असल्यामुळे उपलब्ध असलेल्या एक कायम स्वरूपी व एक कंत्राटी वैद्यकिय अधिका-यावर २४-२४ तास ड्युटी करण्याची वेळ आली आहे. वाढती रुग्ण संख्या पाहता रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. त्यातच सलग २४ तास डयुटी करावी लागत असल्याने रुग्णांबरोबरच येथील वैद्यकिय अधिका-यांचे ही आरोग्य धोक्यात आले असुन त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र याकडे आरोग्य विभाग लक्ष नसल्याचे दिसुन येत आहे.

रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयास १ वैद्यकिय अधिक्षक, ३ वैद्यकिय अधिकारी अन्य कर्मचा-यांचे पदे आहेत. रेणापुर येथे कार्यरत असलेले वैद्यकिय अधिकारी डॉ. तांदळे व डॉ. एस.पी. भोसले यांची पदोन्नती होऊन रेणापूर येथून बदली झाली. त्यामुळे केवळ येथे कार्यरत असलेले डॉ. सईद शेख यांच्यावर रुग्णावर उपाचार करण्याचा भार आला. त्यामुळे आरोग्य विभागाने याची दखल घेऊन रेणापूर येथील ग्रामिण रुग्णालयात तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने वैद्यकिय अधिकारी वर्ग २ चे डॉ. माने व डॉ. स्मिता महाजन याची नियुक्ती केली. त्यातच डॉ. महाजन यांनी १६ ऑक्टोबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे गेल्या महिना भरापासून कायम स्वरूपी असलेले डॉ. शेख व कंत्राटी डॉ. माने हे वैद्यकिय अधिकारी या रुग्णालयाचा भार संभाळत आहेत.

रेणापूर तालुक्याची लोकसंख्या १ लाख ४२ हजारावर आहे. तसेच येथील ग्रामिण रुग्णालय राष्ट्रीय महामार्गा लगतच असल्यामुळे येथील ग्रामीण रुग्णालयात शहरासह तालुक्यातून दररोज २०० ते २५० रुग्ण तपासणी व उपचारासाठी येतात आहेत. राष्ट्रीय महामार्गावर दररोज छोटे – माठे अपघात होत असतात. यातील जखमींना उपचारासाठी याच रुग्णालयात आणले जाते याचे ही मोठे प्रमाण आहे. दरम्यान दोन रिक्त पदामुळे एक कायम स्वरूपी व एक कंत्रटी वैद्यकिय अधिकारी यांच्यावर कामाचा मोठया प्रमाणात तान पडत आहे. परिणामी २४ तास दोघांना डयुटी बजावत लागत असल्याने रुग्णांबरोबरच वैद्यकिय अधिकारी यांचे अरोग्य धोक्यात आले आहे. तेंव्हा येथील ग्रामिण रुग्णालयात दोन वैद्यकिय अधिका-याची कायमस्वरूपी नियुक्ती करावी अशी मागणी रुग्णांतून तसेच रेणापूर शहरवासीयातून केली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या