लातूर : प्रतिनिधी
येथील सरस्वती संगीत कला महाविद्यालय आणि मराठवाडा संगीत कला अकादमी व रिसर्च सेंटर, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी विकासरत्न विलासराव देशमुख स्मृती संगीत समारोहात रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. या संगीत सभेचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांच्या हस्ते झाले. विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व दीपप्रज्वलन करून साहेबांना विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, द्वारकादास शामकुमारचे संचालक तुकाराम पाटील, प्राचार्य डॉ. राम बोरगावकर, लातूर आय. एम. ए. चे अध्यक्ष डॉ. कल्याण बरमदे, प्रा. गणेश बोरगावकर, रघुनाथ मदने, शेख, रमेश बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते.
या समारोहाचा सुरेल प्रारंभ नाशिक येथील दिल्ली घराण्याचे सुविख्यात युवा तबलावादक अथर्व वारे यांनी तबला सोलो वादन करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी त्यांनी पेशकार, रेला, कायदा, चक्रधार याचे अतिशय तयारीने सादरीकरण करून रसिक श्रोत्यांकडून भरभरून दाद मिळविली. त्यांना बहारदार लहरा साथ प्रा. सूर्यकांत घोडके यांनी दिली. त्यानंतर लातूरची बालगायिका भक्ती पाटील यांनी अतिशय तयारीने राग यमन बडाख्याल व छोटा ख्याल मध्ये आळवून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर ‘अबीर गुलाल उधळीत रंग’ हे भजन सादर करून तसेच ‘देव माझा विठू सावळा’ हे गीत रंगतदारपणे सादर करून रसिक श्रोत्यांना भक्तिरंगात डुंबविले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालमणी प्राचार्य डॉ. राम बोरगावकर यांनी केले. प्रभावी सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुदाम पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. बालाजी शिंदे यांनी मानले.