रेणापूर : प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून व आपले पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यात विविध विकासकामे सुरु आहेत. ही विकासकामांची गती व सातत्य आपल्याला कायम ठेवायचे आहे. त्यामुळे आपण सर्वांनी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवावी. येणा-या निवडणुकांत पक्षाला जनाधार द्यावा, असे आवाहन लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी मंगळवारी येथे केले.
रेणापूर तालुक्यातील तळणी (मो) येथे ग्रामपंचायत इमारत, आर. ओ. प्लांट, मातोश्री पाणंद रस्ता अशा विविध विकासकामाचे आमदार धिरज देशमुख यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी मोहगाव (त) येथील सांस्कृतीक सभागृहाचे लोकार्पण केले. तसेच, गावातील विविध वस्त्यांमधील सिमेंट रस्ता, गॅबियन बंधारा, नवीन डीपी व केबल लाईन या विकासकामांचे उद्घाटन केले.
आमदार धिरज देशमुख म्हणाले, कोरोना काळ आता मागे पडला आहे. त्यामुळे विकासकामांनी पुन्हा एकदा गती घेतली आहे. जनतेचा सर्वागीण विकास होण्यासाठी एक साखळी असते. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका ही साखळी आपल्याला मजबूत करायची आहे. येथे एका विचारांचे लोकप्रतिनिधी असले पाहिजेत. याचा ग्रामस्थांनी विचार करावा. ग्रामीण भागाच्या विकासासाठी काँग्रेसला येणा-या सर्व निवडणुकीत भक्कम साथ द्यावी.
तळणी (मो), मोहगाव (त) या गावांसह तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. तळणी (मो) येथील हनुमान मंदिर व लक्ष्मी मंदिरात भाविकांची होणारी गैरसोय दूर करु मोहगाव (त) येथील निजामकालीन शाळेचा आराखडा तयार करुन शिक्षण विभागाकडून या शाळेचा विकास करु. सार्वजनिक स्मशानभूमीचे काम जिल्हा नियोजन विकास निधीतून लवकरात लवकर पूर्ण करु. दोनही गावातील इतर विकासकामांसाठी आणखी निधी दिला जाईल, असे आमदार धिरज देशमुख यांनी सांगितले.
लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विजय देशमुख, रेणा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, लातूर जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव, अनंतराव देशमुख, अनिल कुटवाड, रेणापूर संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष गोविंद पाटील, रमेश सूर्यवंशी, प्रभाकर केंद्रे, गटविकास अधिकारी मोहनराव अभंगे, सरपंच संगीता बालाजी काळे, विश्वासराव देशमुख, धनंजय देशमुख, शहाजी पवार, सरपंच पांडुरंग शिंदे, उपसरपंच बरुरे आदी उपस्थित होते.