लातूर : प्रतिनिधी
यशवंत पंचायत राज अभियानासाठी लातूर जिल्हयातील १० पंचायत समित्या व लातूर जिल्हा परिषदेने तयारी सुरू केली आहे. पूर्वी १०० गुणांचे मुल्यांकण करण्यात येत होते. मात्र या वर्षापासून ४०० गुणांचे मुल्यांकण ग्रा धरले जाणार आहे. विशेष म्हणजे गेल्या दहा महिण्यापासून १० पंचायत समित्या व जिल्हा परिषदेवर प्रशासकांचे राज सुरू आहे. त्यामुळे यशवंत पंचायत राज अभियानाच्या निमित्ताने अत्युत्कृष्ट जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पुरस्कारासाठी या सर्व प्रशासकांचा कस लागणार आहे.
यशवंत पंचायत राज अभियानातंर्गत लातूर जिल्हा परिषद २००७-८ मध्ये लातूर जि. प. राज्यात प्रथम, २०१३-१४ मध्ये प्रथम, २०१५-१६ मध्ये द्वितीय, २०१६-१७ मध्ये राज्यात प्रथम, २०१७-१८ मध्ये विभागीय स्तरावर प्रथम आली आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये विभागाकडून तपासणी झाली होती. मात्र २०१८-१९ या वर्षाचे यशवंत पंचायत राज अभियानाचे राज्यातील अत्युत्कृष्ट जिल्हा परिषदेचे राज्य स्तरावरच्या पुरस्कारामध्ये लातूर जिल्हा परिषदेला कोठेही स्थान मिळाले नाही. मात्र दि. ९ मार्च २०२० रोजी लातूर जिल्हा परिषद विभागातून प्रथम आली होती. गेल्या पाच ते सहा वर्षात लातूर जिल्हा परिषदेला आपल्या कार्याचा ठसा राज्यस्तरावर उमटवता आला नाही.
यशवंत पंचायत राज अभियानासाठी पूर्वी कामाच्या व प्रशासनाच्या संदर्भाने १०० गुणांचे मुल्यांकण होत होते. मात्र यावर्षापासून ४०० गुणांचे पंचायत समित्या व जिल्हा परिषदेचे मुल्यांकण होणार आहे. सदर मुल्यांकण पंचायत समित्या व जिल्हा परिषद स्वत: करणार आहेत. त्या संदर्भाने सध्या तालुका व जिल्हा स्तरावर माहिती संकलीत करण्यासाठी बैठकांचा धडाका सुरू आहे. मार्च २०२२ पासून जिल्हयातील १० पंचायत समित्यावर गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी अधिकारी हे प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. या प्रशासकांच्या कालावधीत झालेल्या कामगीरीकडेही लक्ष असणार आहे. त्यामुळे २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या मुल्यमापनावर अधारीत माहिती संकलीत करण्यात येत आहे.