लातूर : सुक्ष्म उद्योग योजनेच्या माध्यमातून अनेक उद्योगांना मदत होत आहे. महिलामध्ये सुप्त शक्ती असून त्या शक्तीला वाव मिळाला पाहिजे. त्यामुळे शासनाच्या योजनावर आधारीत न राहता महिलांना स्वत:च्या पायावर उभे करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले.
श्रीमती गुणवंतीबेन ठक्कर महिला सशक्तीकरण केंद्राच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त जुना औसा रोडवरील लक्ष्मी कॉलनीतील विवेकानंद संस्कार संस्थेच्या विवेकानंद सभागृहात महिला मेळावा व महिलांनी बनवलेल्या गृहोपयोगी वस्तुंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. बोलत होते. यावेळी सोलापूरच्या उद्योगवर्धिनीच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय सेवा भारतीच्या सहसचिव चंद्रिकाताई चौहान, संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नणंदकर, संस्थेच्या सचिव सौ. मित्ता ठक्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.
आजपर्यंत झालेली वाटचाल पाहता संस्थेला पुढे झेप घेण्यासाठी मार्केटींग व व्यावसायीक दृष्टीकोन स्विकारला पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेतले पाहिजे. आज लातूर मध्ये सुरू असलेल्या या उद्योगाला लातूर जिल्हयाच्या बाहेरही खूप संधी उपलब्ध आसल्याचे सांगून जिल्हाधिकारी पृथ्वीराज म्हणाले की, कोविडच्या काळात ज्या महिला विधवा झाल्या आहेत. त्यांना प्रशिक्षण देवून्ां प्रवाहात आणले तर त्यांच्याही जिवनात भरभराट होणार आहे. त्यासाठी संस्थेने पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्त केली.
प्रास्ताविकात सशक्तिकरण केंद्राच्या सचिव मीता ठक्कर यांनी सहा वर्षात महिलांना प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध करून त्यांना स्वत:च्या पायावर उभा करण्यात यश मिळाल्याचं सांगून केंद्राच्या वतीने तयार करण्यात येणा-या विविध वस्तू खाद्यपदार्थ याची माहिती दिली. तर संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नणंदकर यांनी आपल्या मनोगतात संस्था सुरू करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. यावेळी विवेकांनद संस्थेचे डॉ. अशोकराव कुकडे, निलेश ठक्कर आदी उपस्थित होते. संतोष सोनी यांनी आभार व्यक्त केले.