लातूर : प्रतिनिधी
शेतीच्या वर्तमान अस्वस्थेसह समग्र व्यवस्थेची चिकित्सा करणारे आपल्या सगळयांच्या अभावाचे गाठोडं म्हणजे शेषराव मोहिते यांचे ‘अधले मधले दिवस’ हे ललित लेखन होय. दोन अडीच दशकात बदललेल्या ग्रामीण महाराष्ट्राची कुस डॉ. शेषराव मोहिते नेमकेपणाने उलगडतात. ते शिक्षण, शेती व शेती प्रश्नांकडे भाबडेपणाने न पाहता त्याची अचूक कारणमीमांसा मांडतात, असे मत साहित्यिक आसाराम लोमटे यांनी मांडले.
मराठवाडा साहित्य परिषदेने आयोजित ज्येष्ठ कादंबरीकार शेषराव मोहिते लिखित ‘अधले मधले दिवस’ या ललितलेख पुस्तक प्रकाशन सोहळयात बोलत होते. या प्रसंगी मंचावर अध्यक्ष म्हणून डॉ. जनार्दन वाघमारे, प्रमुख पाहुणे डॉ. अनिरुद्ध जाधव, डॉ. शेषराव मोहिते, मसापध्यक्ष डॉ. जयद्रथ जाधव, सचिव, डॉ. दुष्यंत कटारे आदी मान्यवर उपस्थित होते. अधले मधले दिवस’ मधून मोहिते अवतीभवतीचा संघर्ष मांडून थांबत नाहीत तर उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने तरूणाईच्या समोर सकारात्मक पध्दतीची उगवती पहाट मांडू पाहतात, असे सांगून म्हणाले की, खेड्यातील माणसांना, मातृभाषेला सन्मान देवू पाहतात. मोहिते यांचे जीवनासंबधीचे च्ािंतन मुलगामी असल्याने या लेखनीत कुठेही एकसुरीपणा जाणवत नाही. भारतीय संस्कृतीच्या अस्वस्थेचे चित्रण ते ललित लेखनातून करतात. ग्रामीण समाजाचे उद्ध्वस्त पण ते परखडपणे मांडतात.
यावेळी जाधव म्हणाले की, मोहिते यांच्या शेतीविषयक आस्थेतून आलेल्या लेखनीचे विशेष कौतुक केले. शिक्षणतज्ज्ञ म्हणून समाजात मी सुपरिचित असलोतरी शेतीमातीचा गोतावळा माझ्या आवडीचा प्रांत असल्याने हे पुस्तक विशेषत्वाने भावल्याचे प्रांजळपणे कबुल करतात. या प्रसंगी डॉ. ज्ञानदेव राऊत यांनी ‘अधले मधले दिवस’ ललित लेखाचे मूलगामित्व नेमकेपणानं अधोरेखित केले. अध्यक्षीय समारोपात डॉ. वाघमारे म्हणाले डॉ. मोहिते यांचे ललितलेखन पचवण्याच्या सदरात मोडते. मोहिते यांचे बहुतांश लेख शेतीविषयक चिंतन मांडणारे आहेत. या लेखात शेतक-यांच्या जीवनातील ताण-तणाव, संघर्ष मोठ्या प्रमाणात येतो. शेतकरी जीवनावरचे साहित्य हेच खरे भारतीय साहित्य म्हणून ओळखले जाते. मोहिते यांचे सूक्ष्मलक्षी चिंतन, चळवळीचा अनुभव पाहता त्यांनी ललित लेखनावर समाधानी न राहता वैचारिक लेखन करावे अस मतही त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जयद्रथ जाधव यांनी केले. सूत्रसंचालन कवी प्रा. चंद्रशेखर मलकमपट्टे तर आभार प्रदर्शन मसापचे सचिव डॉ. दुष्यंत कटारे यांनी मानले. या प्रसंगी प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार, अॅड. मनोहरराव गोमारे, रामराजे आत्राम, सुनीताबाई अरळीकर, दिलीप अरळीकर, डॉ. राजशेखर सोलापुरे, डॉ. सतीश यादव, डॉ.रणजीत जाधव, प्रा. नयन राजमाने, डॉ. सुधीर गरड, रमेश चिल्ले, योगीराज माने, नरसिंग इंगळे, रामदास कांबळे, अर्जुन जाधव, प्रा. डी. के. देशमुख, प्रा.झरीटाकळीकर, डॉ. किशनराव भोसले, उषा भोसले, विमल मुदाळे, शैलजा कारंडे, प्रा. संदिपान मोरे, तहसीन सय्यद आदी उपस्थित होते.