लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात दि. १२ मार्च रोजी रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोनानंतर पहिल्यांदाच रंगपंचमी सार्वजनिक स्वरुपात साजरी करण्याची संधी मिळाल्याने तरुण, तरुणी, बालक, महिला, पुरुष आणि वृद्धांनीसुद्धा रंगपंचमीच्या उत्साहात सहभागी होत रंग खेळण्याचा आनंद घेतला. तरुणाई रंगपंमीच्या उत्साहत न्हाऊन निघाली होती. होळीनंतरच्या दुस-या दिवशी संपूर्ण भारतात धूलिवंदनाचा सण साजरा केला जातो; परंतु लातूर जिल्हा आणि परिसरात होळीनंतर पाचव्या दिवशी रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. होळीनंतरचा पाचवा दिवस धरला तर शनिवारी रंगपंचमी साजरी केली जाणे अपेक्षित होते; परंतु ७ मार्च रोजी पौर्णिमा समाप्ती दुपारी झाल्याने रंगपंचमी दि. ११ मार्चऐवजी रविवार, दि. १२ मार्च रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. रंगपंचमीची गेल्या चार दिवसांपासून सर्वत्र तयारी सुरू होती. तरुणांनी रंग खेळण्याचे नियोजन आधीपासूनच केले होते. रविवारी सुटीचा दिवस असल्यामुळे सर्व जण घरीच होते. बच्चेकंपनी अगदी सकाळपासूनच रंग खेळण्याच्या तयारीत होती. मोठी मुलं रंग खेळण्यास घराबाहेर पडण्याअधीच बच्चे कंपनी रंगात रंगून गेली होती.
गल्लीत रंग खेळून झाल्यानंतर तरुणांनी बाईकवर शहरात फेरफटका मारण्यास सुरुवात केली. दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत शहरातील प्रत्येक चौकात रंगात न्हालेल्या तरुणांची गर्दी झाली होती. काही ठिकाणी साऊंड सिस्टीम लावून विविध गाण्यांवर तरुणांनी भन्नाट नृत्य केले. रंगपंचमी हा उत्साहाचा, आनंदाचा सण. रंगांची उधळण मुक्तपणे झाली. या उत्साहात रंगाचा बेरंग होणार नाही, याचीदेखील काळजी घेण्यात आली. तरुण रंग खेळण्यात बेभान झाले होते; परंतु कोणावरही बळजबरीने रंग टाकण्यात आला नाही. दरवर्षीच्या रंगपंचमीत रासायनिक रंगाचा मुक्त वापर होत असे; परंतु यंदा नैसर्गिक आणि हर्बल रंगांचा सर्वाधिक वापर झाला. कोरडा रंग खेळण्याच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले त्यामुळे पाण्याचा होणार अपव्यय झाला नाही. काही ठिकाणी विविध मंडळांनी रंगमंच उभारून रंगपंचमी साजरी केली. या रंगमंचावरही तरुण-तरुणींचा उत्साह पहावयास मिळाला.