लातूर : अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती व अपंग प्रवर्गातील लाभार्थ्यांना तसेच इतर संवर्गातील ज्या पालकांचे वार्षिंक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी अशा पालकांच्या पाल्यांना पहिलीच्या वर्गासाठी २५ टक्के मोफत प्रवेशासाठीची प्रक्रिया दि. २४ जून पासून सुरू झाली आहे. आजपर्यत अहमदपूर, रेणापूर व उदगीर तालुक्यात १०२ विद्यार्थ्यांना पहिलीच्या वर्गासाठी मोफत प्रवेश मिळाला आहे. तर लातूर, औसा, निलंगा, चाकूर, जळकोट, देवणी व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील विविध शाळांनी प्रवेशाचे कागदपत्रे गटशिक्षणाधिकारी स्तरावर देवूनही गेल्या दिड महिण्यात एकाही विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला नसल्याचे समोर आले आहे.
लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्हयातील २३५ कायम विना अनुदानीत इंग्लीश स्कूल, मराठी माध्यम, स्वंय अर्थसहित शाळामध्ये पहिलीच्या वर्गासाठी २ हजार १३० बालकांना २५ टक्के मोफत प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने पालकांच्याकडून दि. ११ ते २९ फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागवले होते. जिल्हयातून इयत्ता पहिलीच्या मोफत प्रवेशासाठी ५ हजार २१४ पालकांनी अर्ज केले होते. राज्यस्तरावरून काढण्यात आलेल्या लॉटरीमध्ये २ हजार ३३ विद्यार्थ्याची इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी निवड झाली आहे. जिल्हयातील २३५ खाजगी शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या १९२ शाळा, तर मराठी माध्यमाच्या ४२ शाळा आहेत.
या मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळेत वंचित व दुर्बल घटकांसाठी २५ टक्के मोफत प्रवेशासाठी प्रक्रीया राबण्यात येत आहे. पहिलीच्या वर्गासाठी प्रवेश घेणा-या बालकांना इयत्ता ८ वी पर्यत मोफत शिक्षण मिळणार आहे. प्रवेश पात्र पालकांनी आपल्या पाल्याचे सर्व कागदपत्रे शाळा स्तरावर दाखल केले आहेत. शाळांनीही जमा झालेले ७०१ विद्यार्थ्यांचे सर्व कागदपत्रे त्या-त्या तालुक्याच्या पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांच्या पाडताळणी समितीकडे दाखल केले आहेत. मात्र सदर कागदपत्रांची समितीकडून पडताळणी होऊन गेल्या दिड महिण्यात केवळ १०२ प्रवेश निश्चित झाले आहेत. इयत्ता पहिलीच्या मोफत प्रवेशासाठी गटशिक्षणाधिकारी स्तरावर दिरंगाई होत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत होत आहे.
शाळा स्तरावर ७०१ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कागदपत्रे जमा
इयत्ता पहिलीच्या मोफत प्रवेशासाठी २ हजार ३३ बालकांची राज्यस्तरावरून लॉटरी काढण्यात आली होती. मात्र कोरोना विषाणूला रोखण्यासाठी गेल्या तीन ते चार महिण्यापासून प्रवेश प्रक्रीया राबवली नव्हती. मात्र दि. २४ जून पासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. ज्या बालकांची पहिलीच्या प्रवेशासाठी निवड झाली त्यांना फोनद्वारे थेट शाळेवर कागदपत्रे जमा करण्यासाठी १ हजार ५३० पालकांना सांगण्यात आले होते.
आजपर्यंत सर्व तालुक्यातील शाळामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांमधून ७०१ पालकांनी आपल्या पाल्यांचे तात्पुरत्या स्वरूपात शाळास्तरावर कागदपत्र प्रवेशासाठी दिले आहेत. सदर शाळांनी सर्व कागदपत्र गटशिक्षणाधिकारी यांच्या प्रवेश पडताळणी समितीकडे पाठवले आहेत. आजपर्यंत केवळ १०२ प्रवेश निश्चित झाले आहेत. यात अहमदपूर तालुक्यात २८ प्रवेश, रेणापूर तालुक्यात १३ तर उदगीर तालुक्यात सर्वाधिक ६१ प्रवेश झाले आहेत. इतर तालुक्यात आजूनपर्यंत एकही प्रवेश झाला नाही.
आठ दिवसात प्रवेश पूर्ण होतील
पहिलीच्या वर्गासाठी २ हजार १३० बालकांना २५ टक्के मोफत प्रवेश दिला जाणार आहे. यापैकी ७० टक्केच्या जवळपास लातूर शहर व तालुक्यात प्रवेश होतात. प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन दिड महिना झाला आहे. पालकांनी कागदपत्रे देवूनही आजपर्यंत एकही प्रवेश निश्चित झाला नाही. या संदर्भाने लातूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ग्रामीन भागाच्या बरोबरच शहरी भागाची प्रवेश प्रक्रिया सुरू केली असून येत्या आठ दिवसात प्रवेश होतील, असे ते म्हणाले.
प्रवेशासाठी ३१ ऑगस्टची मुदत
आरटीई प्रवेश प्रक्रिया करीता २०२०-२१ करीता ज्या बालकांची लॉटरीद्वारे निवड झाली आहे. त्यांनी दि. ३१ ऑगस्ट पर्यंत शाळेत जाऊन प्रवेश घ्यावा. पालकांनी फक्त एसएमएस वर अवलंबून न रहाता आरटीई पोर्टलवर प्रवेशाची तारीख, अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याचा दिनांक पहावा. प्रवेशासाठी जाताना बालकांना बरोबर नेऊ नये. लॉकडाऊनमुळे प्रत्यक्ष प्रवेश घेणे शक्य नसेल तर शाळेशी संपर्क करून व्हॉट्सअॅप, ई-मेल द्वारे कागदपत्रे सादर करून तात्पुरता प्रवेश निश्चित करणे आवश्यक असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी डी. के. हैबतपूरे यांनी दिली.
Read More औसा येथे वाढीव वीजबिले घातली चुलीत