शिरुर अनंतपाळ : प्रतिनिधी
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गटाचे तर सहा पंचायत समिती गणाचे गुरुवारी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. या अपेक्षित आरक्षण सोडत झाली नसल्याने अनेक ईच्छुकांचा हिरमोड झाला असून स्थानिक मातब्बर नेत्यांना इतर मतदार संघाची चाचपणी करावी, लागणार असून प्रतीक्षेनंतर सुटलेल्या या आरक्षण सोडतीनंतर तालुक्यातील इच्छुक उमेदवारांमध्ये कहीं खुशी कहीं गम पहायला मिळाली.
तालुक्यातील येरोळ, साकोळ व हिसामाबाद जिल्हा परिषद गटाचे आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन हॉलमध्ये तर येरोळ, हिप्पळगाव, साकोळ, राणीअंकुलगा, हिसामाबाद व हालकी या सहा पंचायत सामिती गणाची तहसील कार्यालयातील सभागृहात उपजिल्हाधिकारी सदाशिव पडदुणे, तहसीलदार अतुल जटाळे, गट विकास अधिकारी बी.टी.चव्हाण, नायब तहसीलदार तानाजी यादव, सुधीर बिराजदार,राहुल पत्रिके, विस्तार अधिकारी दिनकर व्होट्टे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.
शिरुर अनंतपाळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे तीन गट असून यात येरोळ – सर्वसाधारण (महिला), हिसामाबाद-अनुसूचित जाती (महिला),साकोळ- सर्वसाधारण असे आरक्षण सोडत झाली आहे तर पंचायत समितीचे सहा गण असून यात राणी अंकुलगा-एस सी महिला, साकोळ- सर्वसाधारण,हालकी- सर्वसाधारण, हिसामाबाद ओ.बी.सी. महिला, हप्पिळगाव- सर्वसाधारण महिला तर येरोळ – सर्वसाधारण असे आरक्षण सोडत झाली आहे. दरम्यान तालुक्यात यंदा गटाच्या संख्येत वाढ होऊन हिसामाबाद जि.प. गट नव्याने झाले आहे.
तीन गट व सहा गण असलेल्या या तालुक्यात अनेक स्थानिक नेत्यांनी निवडणुकीची ईच्छा जाहीर केली तर अनेक जण कामाला देखील लागले होते.अपेक्षित आरक्षण सुटावे या आशेने कामाला लागलेल्या ईच्छुकांना चांगलाच फटका बसला असून काहीं ईच्छुकांना मात्र हवे ते आरक्षण सुटल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. पं.स. गण आरक्षण सोडतीला तालुक्यातील विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.