मुंबई : राजधानी मुंबईत घर घ्यायचं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण मायानगरी मुंबईतील घरांच्या किंमती पाहता प्रत्येकाचं हे स्वप्न पूर्ण होतंच असं नाही. त्यामुळेच, तुमच्या स्वप्नातील घर तुम्हाला मिळवून देण्यासाठी म्हाडा या गृहनिर्माण संस्थेकडून घरांची लॉटरी काढली जाते. नुकतेच म्हाडाने मुंबईतील महत्वाच्या प्रभागात 2030 घरांसाठी जाहिरात काढली आहे. त्यामध्ये, अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च गटात विभागणी केली असून या उत्पन्न गटानुसार उमेदवारांना घरासाठी अर्ज करता येणार आहे. त्यामध्ये, अत्यल्प उत्पन्न गटामध्ये अर्जदाराचे वार्षित उत्पन्न 6 लाख रुपये देण्यात आले आहे. तर, उच्च उत्पन्न गटात 12 लाखांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे. विशेष म्हणजे या जाहिरातीत विविध प्रवर्गांसाठी राखीव जागाही आहेत. त्यामध्ये, आमदार-खासदारांनाही राखीव घरं आहेत.
म्हाडाच्या जाहिरातीनुसार, कॉलम 8 ते 21 मध्ये आरक्षित घरांची संख्या आणि कोणत्या प्रवर्गासाठी ते घर राखीव आहे, याची माहिती दिली आहे. या जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे आरक्षण गटनिहाय उपलब्ध सदनिकांच्या 17 नंबर कॉलममध्ये महाराष्ट्रातील मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे संसदेचे, विधानसभेचे व विधानपरिषदेचे आजी-माजी सदस्य म्हणजे आमदार खासदार, माजी आमदार-खासदार यांनाही म्हाडाच्या लॉटरीमध्ये घरांसाठी आरक्षित जागा आहेत. विशेष म्हणजे अत्यल्प उत्पन्न गटातूनही आमदार-खासदारांना घरे देण्यात येत आहेत. म्हणजेच, 6 लाख रुपये उत्पन्न मर्यादा असलेल्या गटातूनही आमदार-खासदारांसाठी घरे आरक्षित असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
लोकप्रतिनिधींना अत्यल्प, अल्प गटांत किती घरं ?
म्हाडाने काढलेल्या सोडतीमध्ये माजी आमदार, खासदारांसाठीही घरे आरक्षित असून अत्यल्प व अल्प उत्पन्न गटात एकूण 15 घरे माजी आमदार व खासदारांसाठी आरक्षित आहेत. त्यापैकी, 14 घरे म्हाडाच्या मुंबईतील विविध ठिकाणी असून 1 घर हे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभ मिळवून देण्यात येत आहेत. मुंबईतील 14 घरांपैकी 12 घरे अल्प गटातून आहेत. तर, 2 घरे ही अत्यल्प गटातून माजी आमदार-खासदारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. तर, प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत 1 घर अत्यल्प उत्पन्न गटातून देण्यात येत आहेत.