सोनखेड : प्रतिनिधी
सोनखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वडेपुरी ता. लोहा येथील माता रत्नेश्वरी गडाच्या पायथ्याशी बिबट्या फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून परिसरातील १० ते १२ गावात दवंडी देऊन सतर्क राहण्याचा इशारा सोनखेड पोलिसांनी दिला आहे. सदर घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली.
वडेपुरी ता. लोहा परिसरातील मातारत्नेश्वरीचे देवस्थान आहे. देवस्थानकडे जाणा-या रस्त्यावर हॉटेल पर्ल जवळ डोंगराच्या पायथ्याशी बिबट्या थांबला असल्याचा व्हीडीओ रस्त्यावरून जाणा-या इसमाने काढला असून असून सदर व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी सोनखेड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक माणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर माहितीला दुजोरा दिला असून खबरदारी म्हणून वडेपुरी परिसरातील १० ते १२ गावांमध्ये हनुमान मंदिरातील भ्रमणध्वनी वरून व दवंडी देऊन गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. या घटनेबाबत वनविभागाशी संपर्क साधला असून वन खात्याचे कर्मचारी बिबट्याचा शोध घेत आहेत. वडेपुरी परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून रात्र जागून काढण्याची वेळ या परिसरातील नागरिकांवर आली आहे.
नागरिकांनी घाबरून जाता सतर्क राहावे असा इशारा पोलिसांनी दिला आहे. या घटनेबाबत पोलिसांनी रविवारी रात्री या परिसरामध्ये बंदोबस्त लावला असून रात्रभर गस्त सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सोनखेड पोलिसांनी सांगितले.

