भुवनेश्वर : ओडिशाच्या पुरीचे गजपती महाराज दिव्यसिंह देव यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून जगन्नाथ मंदिराच्या प्राचीन परंपरेच्या रक्षणाची मागणी केली आहे. ८ जुलै रोजी लिहिलेल्या पत्रात गजपतींनी इस्कॉनने वेगवेगळया वेळी रथयात्रा आणि स्रान यात्रा आयोजित करण्यावर टीका केली.
गजपती महाराज दिब्यसिंह देब हे श्रीजगन्नाथ मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देखील आहेत. त्यांचे म्हणणे आहे की इस्कॉन रथयात्रा अशा तारखांना आयोजित करत आहे, ज्या शास्त्रानुसार नाहीत. यामुळे भक्तांच्या भावना दुखावल्या जात आहेत. गजपती महाराजांनी उज्जैन येथील इस्कॉन मंदिराच्या वतीने १६ ते २५ जुलै दरम्यान मध्य प्रदेशातील ६६ ठिकाणी रथयात्रा आयोजित करण्याच्या योजनेवरही आक्षेप घेतला.
ते म्हणाले की, धार्मिक ग्रंथांनुसार रथयात्रा हा केवळ आषाढ शुक्ल द्वितीयेपासून सुरू होणारा ९ दिवसांचा उत्सव आहे. ते म्हणाले की, महर्षी वेदव्यास यांनी रचलेल्या स्कंद पुराणातही भगवान जगन्नाथांनी स्वत: स्रान यात्रा आणि रथयात्रेची निश्चित तारीख सांगितली आहे. अशा परिस्थितीत मनमानी तारखांना आयोजन करणे हे प्राचीन परंपरा आणि शास्त्रांच्या विरुद्ध आहे.
















