मुंबई : प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून, राज्य सरकार, निवडणूक आयोगाने तशी तयारी सुरू केली आहे. त्यानुसार राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार टप्प्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पहिला टप्पा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पार पडेल, असे सांगितले जात आहे.
महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका या वेगवेगळ््या होणार असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी प्रभाग रचनेचे काम सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेळापत्रक जारी केले जाण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग त्यासाठीच तयारी करत आहे. असे असले तरी निवडणूक आयोग ४ टप्प्यांत निवडणुका घेणार असल्याचे जाहीर करण्यात आलेले नाही. याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. निवडणूक आयोगाकडून याबाबत अधिकृत घोषणा केल्यानंतरही सर्व स्पष्ट होईल. पण याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत.
राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक महत्त्वाच्या शहरांत, जिल्ह्यांत पडद्यामागे प्रचंड राजकीय घडामोडी सुरु आहेत. महायुती असेल किंवा महाविकास आघाडी, प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे निवडणुकीसाठी रणनीती आखली जात आहे. यासाठी युती की आघाडीत निवडणूक लढायची? याबाबतही प्रत्येक पक्षात विचारमंथन होत आहे. त्यातून काय निर्णय घेतला जातो ते आगामी काळात स्पष्ट होईलच. या दरम्यान आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.
राज्यातील अनेक महापालिकांमध्ये २, ३ तर काही ठिकाणी ५ वर्षांपासून प्रशासनाकडून कारभार चालवला जातो. निवडणुका न झाल्याने तिथे सध्या प्रशासनाच्या अख्यत्यारित कामकाज सुरू आहे. आधी कोरोना संकट, यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून सुप्रीम कोर्टात सुरू असलेली सुनावणीमुळे निवडणुकांना विलंब झाला. मात्र, आता सुप्रीम कोर्टाने निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.