नवी दिल्ली : महाराष्ट्रासह एकूण ६ राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून आसाम, मेघालय आणि पश्चिम बंगालमध्ये २५ जूनपर्यंत या भागांत अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सिक्कीम आणि उत्तर बंगालमध्येही सोमवारी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. महाराष्ट्रात मान्सूनचे साधरणत: जूनच्या पहिल्या आठवड्यात आगमन होते. मात्र, यावर्षी जूनचा अर्ध्याहून अधिक काळ उलटला तरी नागरिकांना उकड्याचा सामना करावा लागत आहेत.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. विशेषत: विदर्भात रात्रीच्या वेळीदेखील उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता असून नाईट हीटवेव्हचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. आसाम, मेघालय आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून २५ जूनपर्यंत या भागांत अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली. सिक्कीम आणि उत्तर बंगालमध्येही सोमवारी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली होती.
मान्सूनसाठी वातावरण अनुकूल
दक्षिण-पश्चिम मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी वातावरण अनुकूल बनत असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा, झारखंड आणि बिहारच्या काही भागांमध्ये या आठवड्यात पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह आसपासच्या राज्यांमध्ये गेल्या १५ दिवसांपासून अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नाही. मात्र, आता हवामानातील बदल आणि अनुकूल परिस्थितीमुळे मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत, अशीही माहिती हवामान विभागाने दिली.
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
राजस्थानमध्ये धुळीचे वादळ येण्याची शक्यता असून बिहार, झारखंड आणि ओडिशामध्ये मेघगर्जनेसह हलका पाऊस पडू शकतो. या भागांमध्ये जोरदार वा-यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
















