मुंबई : राज्यसभा निवडणुकीवरून राज्यात आता राजकीय आखाडा तापला आहे. शिवसेनेने दुसरी जागा लढवणार अशी घोषणा केली आहे. आता राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. सहावी जागा निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अपक्ष आमदारांना बैठकीला बोलावले आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीराजे अपक्ष म्हणून मैदानात उतरले आणि त्यानंतर संभाजीराजेंना कोण पाठिंबा देणार, अशी चर्चा रंगली होती. राष्ट्रवादीने पाठिंबा जाहीर केला. पण शिवसेनेने दुसरा उमेदवार उतरवणार असल्याची तयारी सुरू केली आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी अपक्ष आमदारांचे वजन वाढले आहे. शिवसेनेने आपला दूसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अपक्ष आमदारांची शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता वर्षा निवासस्थानी बैठक बोलावली आहे. या बैठकीत अपक्ष उमेदवार काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.