24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रअरे बाप! अचानक ७० फूट जमिनीत गेलं घर

अरे बाप! अचानक ७० फूट जमिनीत गेलं घर

एकमत ऑनलाईन

चंद्रपुर : घुग्घुस येथे भुस्खलन झाल्याने एक अख्खे घर ७० फूट जमिनीत गाडले गेल्याची खळबळजनक घटना घडली. वेकोलीच्या खाणीलगत असलेल्या घुग्घुस येथील आमराई वार्डात ही घटना घडली. याठिकाणचे गजानन मडवी यांचे घर जमिनीखाली गाडले गेले.

एखाद्याच्या पायाखालची जमीन सरकली याचा प्रत्यक्ष अनुभव चंद्रपुरातील गजानन मडवी यांना आला. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिका-यांसह घटनास्थळी पाहणी केली.

या घटनेनंतर परिसरातील आसपासची घरेही खाली करण्याचे आदेश प्रशासनाने नागरिकांना दिले. या नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्याची व्यवस्था करण्यात आली. याबाबत वेकोलीचे वणी विभागाचे मुख्य महाप्रबंधक आभासचंद्र सिंग यांनाही माहिती देण्यात आली.

गजानन मडवी यांच्या घरातील सदस्य घरात बसले असताना अचानक हादरे बसायला सुरुवात झाली, त्यामुळे कुटुंबातील सगळे घराबाहेर धावत आले. परिसरातील लोकांनाही काही समजले नाही. त्यानंतर अवघ्या काही क्षणातच घर कोसळले आणि खड्ड्यात गेले. मडवी यांच्या घरात जवळपास ७० फूट खड्डा पडला त्यामुळे परिसरातील लोकांमध्ये दहशत माजली. नेमका हा प्रकार कशामुळे घडला याबाबत अद्याप कुणालाही माहिती नाही. परंतु परिसरातील कोळसा खाणीमुळे घर जमीनदोस्त झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

घुग्सुस परिसरात भूमिगत कोळसा खाणी आहेत. त्यामुळे मडवी यांच्या घराजवळ ७० फूट खड्डा पडल्याचे लोक सांगतात. सध्या प्रशासनाकडून मडवी यांच्या घराशेजारील असलेली घरे रिकामी करण्यात आली आहे. त्याठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या