कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचे दोन्ही खासदार आणि तब्बल ४ आमदारांना आपल्या तंबूत घेण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी झाले. त्यामुळे या भागात आणखी हातपाय पसरण्यासाठी दोन्ही काँग्रेसमधील काही नेत्यांना बंडखोरी करायला लावण्यात आता शिंदे गट सक्रीय झाला आहे. पहिल्या टप्प्यात सोलापूरचे दोन नेते गळाला लागल्याची चर्चा सुरू असतानाच आता सांगली आणि कोल्हापूरच्या नेत्यांना लक्ष्य करण्यात येत आहे.
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांनी त्यांना साथ दिली. त्यानंतर चार आमदारही त्यामध्ये सहभागी झाले. त्यामध्ये राजेंद्र पाटील, प्रकाश अबिटकर, शहाजीबापू पाटील, महेश शिंदे यांचा समावेश आहे. गेल्या ७-८ वर्षात भाजपने दोन्ही काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या हातात कमळ दिले. यातील काहीजण खासदार तर काही आमदारही झाले. सत्ता गेल्यानंतर भाजप प्रवेशाचा धडाका कमी झाला. शिवाजीराव नाईकसारखे काही नेते परतही गेले.
राज्यात सत्ता आल्यानंतर पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे गट दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांना आपल्या तंबूत घेण्यासाठी सक्रीय झाला आहे. यातील बहुसंख्य नेत्यांच्या सहकारी संस्था आहेत, ज्या अडचणीत आहेत. काहींना सत्तेच्या प्रवाहात सहभागी व्हायचे आहे. अशा नेत्यांना हेरण्याचे काम आता सुरू झाले आहे. याचाच एक भाग म्हणून आमदार बबन शिंदे व माजी आमदार राजन पाटील यांची नावे चर्चेत आली आहेत. यापुढील टप्पा म्हणून सांगली आणि कोल्हापूरातील काही नेत्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. दोन वर्षातच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला टक्कर देत विजयाचा झेंडा फडकवू शकणारे अथवा फडकविण्यास हातभार लावू शकणारे नेते आता भाजपला हवे आहेत.
कोल्हापुरात माजी आमदार चंद्रदीप नरके आणि सुजित मिणचेकर यांची नावे सध्या भाजप प्रवेशाच्या चर्चेत आहेत. सांगली जिल्ह्यातील काही नेते भाजपच्या मार्गावर आहेत. या जिल्ह्यात पक्ष अनेक गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे या गटांना एकत्र ठेवेल, असा मोठा नेता भाजपला हवा आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. सातारा जिल्ह्यात पक्षात घेण्यासारखा मोठा नेता राहिला नाही. तरीही विधानसभा निवडणुकीत मदत होईल, असे प्रमुख कार्यकर्ते हेरण्याचे काम सध्या सुरू आहे.