मुंबई : विधानसभेत सोमवारी (ता. ४) एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारने बहुमत सिद्ध केले. यावेळी सरकारला १६४ मते पडली तर केवळ ९९ मते विरोधात पडली. एकनाथ शिंदे सरकारच्या विरोधात पडलेले एक मत आदित्य ठाकरे यांचे होते. आता त्यांना अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वतीने एकनाथ शिंदे गटाचे भरत गोगावले यांना शिवसेनेचे मुख्य प्रतोद म्हणून मान्यता देण्यात आली. त्यांनी एकनाथ शिंदे सरकारच्या समर्थनार्थ मतदान करण्यासाठी व्हिप जारी केला होता. मात्र, आदित्य ठाकरे यांनी विरोधात मतदान केले. यामुळे आदित्य ठाकरे यांची आमदारकी जाणार का? याची चर्चा सुरू झाली आहे.
दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाच्या वतीने सुनील प्रभू यांनी सरकारच्या विरोधात मतदान करण्यास सांगितले होते. त्यावर उद्धव ठाकरे गटाच्या १५ आमदारांनी सरकारच्या विरोधात मतदान केले. विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या मुख्य व्हिपला मान्यता दिल्याने आणि त्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने आदित्य ठाकरे आणि इतर १४ शिवसेना आमदारांवर कारवाई होऊ शकते, असे आता बोलले जात आहे.