मुंबई : अयोध्येतील संघर्षाचा काळ आता संपलेला आहे. लवकरच अयोध्येला जाऊन दर्शन घेणार आहे. प्रार्थना करणार आहे. मे महिन्याच्या पूर्वार्धात अयोध्येला जाणार असल्याचे शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे यांनी आज रविवारी कोल्हापूर पोटनिवडणुकीतील निकाल, मनसेचा आक्रमक पवित्रा आदी विषयांवर भाष्य केले. मनसेकडून हनुमान चालिसाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याबद्दल आदित्य ठाकरे म्हणाले की, एक-दोन पक्ष नव्याने हे करायला लागले आहेत. परंतु, आम्ही वर्षानुवर्षे हे करत आहोत. आपले सणवार हे जल्लोषात साजरे व्हावेत, ही सगळ्यांचीच भूमिका आहे. कोविडनंतरदेखील लोक खूप उत्साहाने या सगळ्या गोष्टी करायला लागले आहेत, ही चांगली सुरूवात असल्याचे ठाकरे म्हणाले.
कोल्हापूर पोटनिवडणुकीत मोठ्या मतांच्या फरकाने महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. मतदारांनी महाविकास आघाडी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमच्या सर्व स्थानिक नेत्यांवर विश्वास ठेवून ही जागा पुन्हा मविआला दिली आहे.