मुंबई : महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार होते पण त्यांना ही संधी मिळू शकली नाही. त्याऐवजी शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. याबाबतचा खुलासा शिंदे यांनी आज विधानसभेत बोलताना केला.
विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी विधानसभेत भाषण केले. यावेळी ते म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सुरुवातीला मीच संभाव्य मुख्यमंत्री होतो. पण नंतर अजित पवार किंवा इतर कोणीतरी म्हटले की, मला मुख्यमंत्री बनवू नये. त्यावेळी मी म्हटले मला काहीही अडचण नाही, उलट मी उद्धव ठाकरेंना म्हटले की त्यांनी पुढे यावं मी तुमच्यासोबत आहे. माझी मुख्यमंत्रीपदावर कधीही नजर नव्हती.
आम्ही शिवसैनिक आहोत आणि आम्ही नेहमी बाळासाहेबांचे आणि आनंद दिघेंचे शिवसैनिक राहू. मला तुम्हाला हे लक्षात आणून द्यायचे आहे की, तुम्ही सगळे त्यांच्यासोबत गेले आहात, ज्यांनी बाळासाहेबांना ६ वर्षांसाठी मतदानावर बंदी आणली होती, अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या आमदारांना टोला लगावला.