पुणे : डॉक्टरजातीला काळिमा फासणारी घटना पुण्यात घडली आहे. उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या एका १९ वर्षीय तरुणीवर डॉक्टरनेच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या डॉक्टरने पीडित तरुणीचे मोबाईलमध्ये अश्लील फोटो काढले आणि याविषयी कुणाला काही सांगितल्यास सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित डॉक्टरविरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे.
१९ वर्षीय तरुणी डॉक्टरांकडे उपचारासाठी आली होती. यावेळी डॉक्टरांनी तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. अत्याचार करताना त्या तरुणीचे अश्लील फोटो काढून घेतले.
घडलेल्या प्रकारासंदर्भात कुटुंबीयांना अथवा कोणाला माहिती दिल्यास फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. मात्र तरुणीने धमकीला न जुमानता कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार कुटुंबीयांनी कोथरूड पोलिसांकडे तक्रार दाखल केली. ४५ वर्षीय डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली आहे.